Sat, Jun 06, 2020 23:46होमपेज › Solapur › पोलिसांकडून संशयित आरोपीस खुर्ची, तक्रारदारांचा अपमान(व्हिडिओ) 

पोलिसांकडून संशयित आरोपीस खुर्ची, तक्रारदारांचा अपमान(व्हिडिओ) 

Published On: Feb 11 2018 7:55PM | Last Updated: Feb 11 2018 7:55PMसोलापूर : प्रतिनिधी

फिर्याद देण्यासाठी गेलेल्या भाजप नगरसेवकांना पोलिसांनी अवमानास्पद वागणूक दिली. त्याविरोधात भाजपच्या इतर नगरसेवकांनी रविवारी सकाळी शास्त्रीनगर (सदर बझार पोलिस ठाणे अंकित) पोलिस चौकीसमोर ठिय्या आंदोलन करत फिर्याद घेण्यास भाग पाडले.

रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास  सचिन गायकवाड (रा. पंचशीलनगर, सोलापूर) हा नगरसेवक  मंगला सोमनाथ पाताळे (रा. भारतरत्न इंदिरानगर, सोलापूर) यांच्या राहत्या घरात घुसला. पहाटे घरात कोणी नसल्याने सचिन याने पाच वर्षीय चिमुरडी श्‍वेता पाताळे हिच्या गळ्यावर सुरा ठेवून पैशांची मागणी केली. श्‍वेता हिची आई ज्योती पाताळे यांनी मोठ्याने किंचाळून आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी हाक दिली. काही वेळातच आजूबाजूचे लोक जमा झाले. लोकांना पाहून सचिन याने तेथून पळ काढला. नगरसेवक मंगला पाताळे आपल्या कुटुंबीयांसह शास्त्रीनगर पोलिस चौकीत फिर्याद देण्यासाठी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गेल्या. पोलिसांना सविस्तर हकीकत सांगून संशयित आरोपीविरुध्द  फिर्याद नोंदवून घेण्यासाठी आग्रह धरला.

पोलिसांनी सचिन गायकवाड याला पकडून पोलिस ठाण्यात आणले. त्याची विचारपूस करत बसण्यासाठी खुर्ची दिली व फिर्याद देण्यासाठी आलेल्या सर्वांना पोलिस चौकीच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे नगरसेवक मंगला पाताळे व त्यांच्या कुटुंबीयांनी हा आरोपी आहे, त्याला सन्मानाची वागणूक का दिली जात आहे, असे पोलिसांना विचारले. त्यावर भडकून  पोलिसांनी सर्व फिर्यादींना पोलिस चौकीच्या बाहेर ढकलून दिले व वादास सुरुवात झाली. पोलिसांनीच या प्रकाराचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांच्या अशा अवमानास्पद वागणुकीमुळे नगरसेवक मंगला पाताळे यांनी भाजपच्या इतर नगरसेवकांना पोलिस चौकीत बोलावून घेतले व ठिय्या आंदोलन सुरु केले. नगरसेवक कांचन यन्नम, नगरसेवक शिवानंद पाटील, सुनील पाताळे, ज्योती पाताळे, गल्लीतील इतर लोकांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केल्यामुळे सकाळी 8 च्या सुमारास सेकंड पीआय सय्यद घटनास्थळी दाखल झाले व फिर्याद नोंदवून घेण्यास सांगितले. संशयित आरोपी सचिन गायकवाड यास ताब्यात घेतले. परंतु, सकाळी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत शास्त्रीनगर पोलिस चौकीत अतिशय नाट्यमयरित्या आरोपीस सन्मानाची वागणूक व फिर्यादीस अवमानास्पद वागणूक मिळाली.

या घटनेविरोधात सोमवारी भाजपचे सर्व नगरसेवक त्या पोलिस कॉन्स्टेबलविरोधात पोलिस आयुक्तांना तक्रार करणार असल्याची माहिती दिली.