Tue, Mar 26, 2019 20:02होमपेज › Solapur › नगरसेवक संदीप पवार यांची गोळ्या घालून हत्या

नगरसेवक संदीप पवार यांची गोळ्या घालून हत्या

Published On: Mar 19 2018 1:49AM | Last Updated: Mar 18 2018 10:42PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची रविवारी भरदिवसा अज्ञात 6 ते 7 मारेकर्‍यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर शहरासह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. गुढीपाडव्याचा सण असूनही शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. दरम्यान, या मारेकर्‍यांनी टाकून दिलेला सत्तूर पोलिसांनी ताब्यात घेतला असून आरोपींच्या शोधासाठी 3 पथके तैनात केली आहेत. सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहून पुढील तपास सुरू असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी सांगितले. 

संदीप पवार हे रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवर असलेल्या हॉटेल श्रीराम भोजनालय येथे काही मित्रांसोबत चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या 6 ते 7 मारेकर्‍यांनी पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला. 3 मारेकर्‍यांनी सत्तूर  आणि  कोयत्याने सपासप वार केले तर दोन जणांकडे गावठी पिस्तूल होते त्यातून 5 गोळ्या झाडण्यात आल्या, असे हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्याचवेळी अन्य दोनजण हॉटेलबाहेर थांबले होते, असेही सांगितले जाते. गोळ्या घालून, सत्तुराने सपासप वार केल्यानंतर मारेकर्‍यांनी लक्ष्मी रोड मार्गे पळून जाताना त्यांनी युनियन बँकेजवळ गुन्ह्यासाठी वापरलेला सत्तूर टाकून दिला.

ही घटना झाल्याचे समजताच संपूर्ण पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी तातडीने सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, शहर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सारंग चव्हाण यांच्यासह पोलिस कुमक दाखल झाली.  तोपर्यंत हॉटेल श्रीरामसमोर संदीप पवार समर्थकही मोठ्या संख्येने जमा झाले होते. उपचारावेळी मृत्यू  जखमी अवस्थेतील संदीप पवार यांना पोलिसांच्या वाहनातूनच अ‍ॅपेक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गंभीर जखमी असलेल्या पवार यांची याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी सोलापूर येथे नेण्यास सांगितले. सोलापूर येथे अश्‍विनी हॉस्पिटल येथे दाखल केले असता सायंकाळी  साडेचार वाजण्याच्या सुमारास संदीप पवार यांचा  मृत्यू झाल्याचे  डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक एस.विरेश प्रभू, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सीक तपासणी पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.  त्याठिकाणी पडलेल्या रक्‍तासह विविध वस्तुंचे नमूने घेण्यात आले. तसेच मारेकर्‍यांना पकडण्यासाठी पोलिसांची 3 पथके रवाना करण्यात आलेली आहेत.

घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर जवळपास असलेल्या दुकानांतील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येत आहे. रविवारचा दिवस  आणि गुढी पाडव्याच्या सणामुळे पंढरपूर शहरात मोठी गर्दी होती. परंतु, गोळीबाराची घटना समजताच संपूर्ण शहरात शुकशुकाट पसरला असून तणावपूर्ण शांतता पसरली आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता संवेदनशील ठिकाणी, तसेच संदीप पवार यांच्या घराच्या परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 

6 ते 7 मारेकर्‍यांनी हल्‍ला केल्याचा अंदाज असून 5 गोळ्या झाडल्याचे दिसून येत आहे. सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले जात असून आरोपींच्या शोधासाठी 3 पथके तैनात केली आहेत. त्याचबरोबर मारेकर्‍यांना पकडण्याचे प्रयत्न वेगात सुरू आहेत. 

- डॉ. एस. वीरेश प्रभू, जिल्हा पोलिस अधीक्षक 

  • • संदीप पवार यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. चार गोळ्या छातीतून आणि पोटातून आरपार तसेच एक गोळी डाव्या बाजूच्या दंडात घुसल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले. 
  • • सत्तूरने त्यांच्या डोक्यावर, हातावर, मानेवर सपासप वार करण्यात आल्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाल्याचे दिसून आले. 
  • • नगरसेवक संदीप पवार यांचे वडील दिलीप पवार यांचीही सुमारे 18 वर्षांपूर्वी भादुले चौकात निर्घृण हत्या करण्यात आली होती. 
  • • 2016 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 10 ब मधून संदीप पवार हे अपक्ष नगरसेवक म्हणून मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले होते. 10 अ प्रभागातून त्यांच्या मातोश्री सुरेखा पवारही अपक्ष विजयी झाल्या होत्या.