Wed, Jun 26, 2019 12:19होमपेज › Solapur › ‘परिवहन’वरून आयुक्‍तांवर हल्लाबोल

‘परिवहन’वरून आयुक्‍तांवर हल्लाबोल

Published On: May 11 2018 9:58PM | Last Updated: May 11 2018 9:24PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिका परिवहन कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपाला 32 दिवस उलटून तोडगा न निघाल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी शुक्रवारी महापालिका सभेत रणकंदन माजवून सत्ताधारी भाजप व आयुक्‍तांना लक्ष्य केले. सुमारे साडेतीन तासांच्या वादळी चर्चेनंतर महापौरांनी याप्रश्‍नी शनिवारी बैठक घेण्याचे आश्‍वासन देत, विरोधकांची पुन्हा बैठक घेण्याच्या आश्‍वासनावर बोळवण केली. मार्च, एप्रिलची तहकूब सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे उपस्थित होते. सभेच्या कामकाजाला सुरुवात होताच माकप तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनी परिवहन संपाविषयी लक्षवेधीची मागणी केली.

यावेळी या नगरसेवकांनी हातात काळे झेंडे, फलके तसेच जॅकेट परिधान केले होते. फलकांवर दलितविरोधी असलेल्या पालकमंत्र्यांचा निषेधासह परिवहन कर्मचार्‍यांच्या दयनीय अवस्थेबाबतचा मजकूर होता. ‘भ्रष्ट आयुक्त हटाव, परिवहन बचाव’ असा मजूकर असलेल्या जॅकेटस्ने सभागृहाचे लक्ष वेधले. या मजकुराला आयुक्तांनी आक्षेप घेत खुलाशाची मागणी केली. खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. यावर संतप्त झालेले काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी ‘खुशाल कारवाई करा’ असे म्हणत परिवहन विषयी तावातावाने बोलण्यास सुरुवात केली. यावेळी अन्य सदस्यांनीही सत्ताधारी तसेच प्रशासनाच्या विरोधात रान उठवत एकच गदारोळ केला. यावर भाजपचे सदस्य आक्रमक होत ‘त्या’ मजकुराला आक्षेप घेतला. शेवटी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य यु.एन. बेरिया यांनी शिष्टाई करीत आयुक्तांविरोधात वादग्रस्त मजकूर असलेले जॅकेट अंगावरुन उतरविण्याची सूचना केली. त्यानुसार जॅकेट काढून टाकल्यानंतर वाद मिटला. बेरिया यांनी मनपाच्या इतिहासात परिवहनबाबत 32 दिवसांचा संप कधीच झाला नसल्याचे सांगत परिवहनविषयी तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी परिवहन प्रश्‍नी सत्ताधार्‍यांची भूमिका काय आहे, असा सवाल करीत शहरातील अनेक प्रश्‍नांकडे लक्ष वेधत भाजपने आत्मचिंतन करावे, असा टोला लगाविला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे दलितविरोधी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केल्यावर भाजपचे सदस्यही आक्रमक बनले.

विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी परिवहनविषयी तात्पुरती मलमपट्टी न करता प्रभावी उपाययोजनेची मागणी केली. माकपच्या कामिनी आडम, शिवसेनेचे राजकुमार हंचाटे, देवेंद्र कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर, काँग्रेसच्या अनुराधा काटकर, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव आदींनी परिवहनविषयी भाष्य केले. शेवटी महापौरांनी याप्रश्‍नी शनिवारी दुपारी पाच वाजता बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. 4 मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी परिवहन कामगार संपावर तोडगा काढण्याची मागणी केली असता महापौरांनी सभा संपल्यानंतर लगेच बैठक घेण्याचे सभागृहातच आश्‍वासन दिले होते.
वाया जाणार्‍या पाण्याबाबत गांभीर्य नाही

सभा सुरु असताना भाजपचे नगरसेवक राजेश काळे यांनी जुळे सोलापुरातील पाणी टाकी भरुन वाहात असल्याचे सांगत सभेचे लक्ष वेधले, मात्र याबाबत प्रशासनाने काहीच गांभीर्य दाखविले नाही. एकीकडे शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना टाकी भरुन वाहात असल्याबाबत महापौर व आयुक्तांनी याबाबत कुठलीही विचारणा वा आदेश न देणे पसंत केले. आपण सारेच भ्रष्ट : धुत्तरगावकर आयुक्त भ्रष्ट असल्याच्या ‘त्या’ मजकुराला हात घालत शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केवळ आयुक्तच नव्हे, आपण सारे नगरसेवक भ्रष्ट असल्याचे विधान करुन एकच खळबळ उडवून दिली. यावर अनेकांनी आक्षेप घेतल्यावर त्यांनी भ्रष्ट आचार करणारा माणूस हा भ्रष्ट असल्याची सोपी व्याख्या केली. मराठा समाजास आरक्षण देण्याची शिफारस करणारा ठरावही या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. एलबीटीबाबत आयुक्तांना विशेषाधिकार देण्याचा निर्णयही सभेने घेतला. अर्धवेळ कर्मचार्‍यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन देणे यासह अन्य विषयांनादेखील मंजुरी देण्यात आली.