Sun, Mar 29, 2020 07:30होमपेज › Solapur › महानगरपालिकेच्या तिजोरीवर कोरोनोचा मोठा परिणाम होणार

महानगरपालिकेच्या तिजोरीवर कोरोनोचा मोठा परिणाम होणार

Last Updated: Mar 25 2020 9:11PM

संग्रहीत छायाचित्रसोलापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगासह भारत देशाच्या आरोग्यावर घाला घातला असतानाच भविष्यात मोठ्या आर्थिक संकटालादेखील सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या मिळकत करासह सर्वच कर वसुल्यांना कोरोनामुळे ब्रेक लागल्याचा मोठा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर होणार आहे. याचे दूरगामी परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या शहर व हद्दवाढ विभागाकडे मिळून मिळकत कराची जवळपास सव्वाचारशे कोटींची कर थकबाकी होती. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी थकीत करावरील दंडाच्या रकमेत 75 टक्के माफी दिल्याचा लाभ घेत गेल्या काही महिन्यांत नागरिकांनी कर भरणा करत चांगला प्रतिसाद दिला. महापालिकेच्या तिजोरीत जवळपास 140 कोटींचा महसूल जमा झाला होता.

परंतु, गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जगासह भारत देश, महाराष्ट्रासह सोलापूरवर संकट आणणारा ठरला आहे. महापालिकेची यंत्रणा सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तैनात आहे. पालिकेच्या सर्व विभागांचे लोकांशी निगडीत काम बंद झाले आहे. महापालिकेने कराची वसुलीदेखील थांबवली असल्याने पालिकेच्या तिजोरीत दैनंदिन येणारी आवक मंदावली आहे. बांधकाम परवाना विभागासह सर्व परवाने देण्याचे काम थंडावले आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठीच्या कामात व्यस्त आहे.

भांडवली निधीसह सर्वच विकासकामे संकटात 

कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेचा आर्थिक डोलारा कोलमडणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाचेही आर्थिक गणित बिघडणार आहे. 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरातून बाहेरच पडणार नसल्याने पुढील महिन्यात नागरिकांचे पगार होणेदेखील मुश्किल आहे, तर उद्योग, व्यापारीदेखील आर्थिक संकटात सापडणार आहेत. महापालिकेच्या तिजोरीत महसूल येणार नाही आणि केंद्र व राज्य सरकारकडून मदतीची शक्यता नसल्याने महापालिकेची विकासकामे संकटात येणार आहेत.