Fri, Jul 19, 2019 17:42होमपेज › Solapur › शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर निवडणूक लढविणार : राजू शेट्टी

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर निवडणूक लढविणार : राजू शेट्टी

Published On: May 26 2018 12:20AM | Last Updated: May 26 2018 12:16AMसांगोला  : वार्ताहर

शेतकर्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न, धनगर समाजाचे आरक्षण या प्रश्‍नांवर 2019 ची निवडणूक लढविणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांनी केले. राजमाता प्रतिष्ठानच्या विद्यमाने आयोजित केलेल्या कोळा येथील अर्जुन चौक येथील अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.  ते पुढे म्हणाले, सांगोला तालुक्यातील बहाद्दूर शेतकरी डाळिंब उत्पादन करणारा मजुरांना 400 मजुरी देऊ शकतो मात्र सरकार रोजगार हमी मजुरांना केवळ 166 रुपये मजुरी देते याची त्यांनी खंत व्यक्‍त केली.

मजुरांचे हित राज्यकर्त्यांनी जोपासले पाहिजे. शेतकरर्‍यांना हमी भाव मिळवून दिला पाहिजे, डाळिंबावर पडणार्‍या रोगावर सरकारने संशोधन केले पाहिजे, त्यांना मदतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. 9 लाख ऊस तोड मजुरांना ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी आज रोजगार उपलब्ध करून दिला आहे. देशात तीन वर्षांत धान्याचे विक्रमी उत्पन्न होऊनदेखील भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांवर गळफास घेण्याची वेळ आलेली आहे. शेतकर्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न, धनगर समाजाचा राज्यात व केंद्रात चाललेला आरक्षणाचा घोळ यासाठी येत्या अधिवेशनात या प्रश्‍नांवर आवाज उठवून तो सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे सरकार उद्योगपतींचे कल्याण करण्याचे काम करत आहे. सरकार धार्जिण्या विमा कंपन्यांनी 9 हजार 41 कोटी विम्याची रक्कम जमा केली असून केवळ 812 कोटी विम्याची रक्कम शेतकर्‍यांना दिली. उद्योगपतींनी मात्र 41 हजार कोटींची कर्जे बुडविली मात्र शेतकर्‍यांना देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही याची त्यांनी खंत व्यक्त केली. 

यावेळी जि.प.सदस्य अ‍ॅड.सचिन देशमुुख,  संभाजी आलदर, मारुती सरगर, विकास शिंत्रे, विजय खरात, तेजस लेंगरे, निवांत कोळेकर, प्रविण काकडे, दत्तकुमार खंडागळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, जि.प. सदस्य, विविध पक्षाचे नेते मंडळी व आसपासच्या पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.