Tue, Jul 16, 2019 12:17होमपेज › Solapur › कंटेनर-टेम्पोच्या धडकेत चालक ठार

कंटेनर-टेम्पोच्या धडकेत चालक ठार

Published On: Apr 06 2018 10:07PM | Last Updated: Apr 06 2018 9:50PMसोलापूर : प्रतिनिधी

जड वाहतूक बंदीच्या काळात मार्केट  यार्ड  ते  शेळगी ब्रिज या रस्त्यावर एका कडेने थांबलेल्या वाहनांवर आदळून झालेल्या अपघातात आयशर टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दुपारी एकच्या सुमारास झाला.

गौतम रामचंद्र कांबळे (वय 32, रा. रामतीर्थ (दुबुलगुंडी), पेठगेटा, ता. बसवकल्याण, जि. बीदर) असे मरण पावलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.सोलापूर  शहरातून  जड   वाहतुकीस बंदी करण्यात आलेली आहे. जड वाहतूक बंदीचा कालावधी हा दुपारी दीडनंतर शिथिल करण्यात येऊन नंतर जड वाहतूक शहरातून जाते.  मार्केट यार्ड चौकापासून शहराकडे येणारी जड वाहतूक ही बंदी काळात मार्केट यार्ड ते शेळगी ब्रिज ते जुना तुळजापूर नाका ते पुणे रोड या मार्गावर रस्त्याच्या एका बाजूने थांबते. त्यामुळे या रस्त्यावर जड वाहतुकीच्या वाहनांची मोठी रांग लागते. शुक्रवारी दुपारी अशाचप्रकारे जड वाहतुकीची मोठी रांग लागलेली असताना पुणे रोडने आलेल्या गौतम कांबळे  याने  त्याच्या ताब्यातील एमएच 12 पीक्यू 9544 हा आयशर टेम्पो भरधाव चालवून शेळगी ब्रिजवर रांगेत  थांबलेल्या एका कंटेनरला मागून जोरदार धडकवला. या अपघातात टेम्पोच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला असून चालक गौतम कांबळे हा केबिनमध्ये अडकला. 

याची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय पवार, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त टेम्पोतून जखमी अवस्थेत चालक कांबळे यास बाहेर काढले. अपघातामध्ये चालक कांबळे याचे दोन्ही पाय तुटले असून डोक्याला जबर मार लागल्याने त्यास पोलिस नाईक आर. एन. जाधव यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ. पंकज पावरा यांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या अपघाताची नोंद जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मार्केट यार्ड ते शेळगी ब्रिज या रस्त्यावर तीन अपघातांत तीनजणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका पोलिस कर्मचार्‍याचाही समावेश आहे. त्यामुळे मार्केट यार्ड चौकात वाहतूक व्यवस्थित राहावी म्हणून पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त नेमून वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे संचलन करावे, अशी अपेक्षा   नागरिकांमधून  व्यक्त होत आहे.