Tue, Apr 23, 2019 23:32होमपेज › Solapur › २०१९ मध्ये काँग्रेसची सत्ता येणारच :  खा. दलवाई

२०१९ मध्ये काँग्रेसची सत्ता येणारच :  खा. दलवाई

Published On: Dec 26 2017 1:35AM | Last Updated: Dec 25 2017 10:45PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

आम्ही संघटन अधिक मजबूत करीत  आहोत, दुसर्‍या  बाजूला भाजपा सरकारच्या बाबतीत नाराजी आहे  त्यामुळे  त्यांची  मते  कमी झालेली  आहेत. काँग्रेस पक्ष सत्तेत येण्यासाठी तो फरक  आम्ही  एका वर्षात भरून काढू आणि याच्याच जोरावर  2019 मध्ये देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा येईल, असे मत राज्यसभेचे खा. हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.

खा. दलवाई हे सोमवारी खासगी कार्यक्रमानिमित्त सोलापूर येथे आले  असता  सायंकाळी  त्यांनी  काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे   बोलताना   दलवाई   म्हणाले  की,  गुजरात  निवडणूक  काँग्रेसने   चांगल्या पध्दतीने लढविली. काँग्रेसने चांगले उमेदवार दिल्याची तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. भाजपाला गुजरात निवडणुकीमध्ये शहरी भागात चांगली मते मिळाली. दुसर्‍या टप्प्यात पंतप्रधान व भाजपाने चुकीचे वळण दिले. त्यामध्ये जातीयवादाची भीती दाखविणे, लोकांना घाबरवणे, पाकिस्तानचा उल्लेख करणे, अतिशय वाईट  भाषा वापरणे असे प्रकार करण्यात आले. त्याही परिस्थितीत काँग्रेसने चांगली लढत दिली. मोदींचे सचिव असलेल्या व्यक्तीला  गुजरात निवडणुकीचे आयुक्त म्हणून  पाठविण्यात आले होते. त्यातून लोकशाही मजबूत करण्याच्या ज्या संस्था आहेत, त्या नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान भाजपाकडून सुरु आहे.

भाजप सरकार हे गरिबांच्या विरोधातील सरकार आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद केल्या, विकास हा केवळ काही ठराविक लोकांचाच सुरु असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांनी शेती करु नये त्यांनी कामगार व्हावे असे धोरण या सरकारकडून आखले जात आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी मोठमोठ्या उद्योजकांच्या घशात घालण्याचे काम सुरु आहे. मोठे मॉल आणून छोटे व्यापार्‍यांनाही नष्ट करण्याचे काम सुरु आहे. पंतप्रधान जी भाषा वापरतात ती भाषा वाजपेयी, महाजनांनी कधी वापरली नव्हती. आरएसएसच्या शाखेवर जी भाषा वापरली जाते ती भाषा पंतप्रधानांकडून वापरली जात आहे. खोटे बोलायचे,  कायद्यामध्ये बदल करणे चालू असल्याने एकप्रकारे नाझीवादाकडे चाललो असल्याचे दिसून येत असल्याचेही दलवाई यांनी सांगितले. 

याप्रसंगी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी सोलापुरातील उद्योगांच्या अडचणीबाबत  मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योगाबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे बैठक बोलावण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रदेशचे सरचिटणीस धर्मा भोसले, प्रा. प्रकाश सोनवणे, माजी महापौर नलिनी चंदेले, आसिफ नदाफ, हाजी मलंग नदाफ, ए. डी. चिन्नीवार आदी उपस्थित होते.