Thu, Jul 18, 2019 02:50होमपेज › Solapur › अवजड वाहतुकीविरोधात काँग्रेसचे रास्ता रोको!

अवजड वाहतुकीविरोधात काँग्रेसचे रास्ता रोको!

Published On: Sep 02 2018 1:18AM | Last Updated: Sep 01 2018 9:45PMसोलापूर : प्रतिनिधी

रस्ता आहे की मृत्यूचा सापळा, आणखी किती निष्पाप बळी घेणार, अशा घोषणा देत सोलापूर शहरातील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी करीत काँग्रेसच्या वतीने अक्कलकोट रोडवरील शांती चौकात भर पावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अवजड वाहतुकीमुळे शहरावासीयांच्या बळींचे सत्र सुरूच असून, त्यामुळे जनमाणसांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

शहरातून होणार्‍या अवजड वाहतुकीमुळे गेल्या आठवड्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल आ. प्रणिती शिंदे यांनी घेत अक्कलकोट रोडवरील शांती चौक येथे शनिवारी दुपारी एक ते अडीच वाजण्याच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात नगरसेवक चेतन नरोटे, तिरूपती परकीपंडला, रियाज हुंडेकरी, बाबा करगुळे, विवेक कन्ना, रवी बुराणपुरे, गोवर्धन कमटम, कार्यकर्ते आणि जड वाहतुकीमुळे बळी गेलेल्या नागरिकांचे नातेवाईकही सहभागी झाले होते. 

आणखी किती निष्पाप बळी जाण्याची वाट बघणार, रस्ता आहे की मृत्यूचा सापळा, जड वाहतूक पूर्णपणे बंद केली पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आ. शिंदे यांनी यापूर्वी जड वाहतूक बंद करण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळेस जड वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू केली होती. परंतु, पुन्हा ही वाहतूक शहरातून सुरू झाली असून काही दिवसांपूर्वी एका नागरिकाचा बळी गेला. त्यामुळे पुन्हा त्या आक्रमक झाल्या. 

यावेळी पोलिस प्रशासनातील अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि मनपा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. शिंदे यांनी एपीआय दीपाली काळे यांना जड वाहतूक बंद करण्याबाबतचे लेखी निवेदन दिले.

दुर्घटना टाळण्यासाठी अवजड वाहतूक बंद करा
सध्या ज्या मार्गाने अवजड वाहतूक शहरातून केली जात आहे त्या मार्गाजवळ अनेक शाळा, महाविद्यालये, कारखाने आहेत. येथून नागरिकांबरोबर शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी व कामगार मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे पुढील दुर्घटना टाळण्यासाठी या मार्गावरील जड वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.