Thu, Apr 25, 2019 23:25होमपेज › Solapur › काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी!

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी!

Published On: Feb 05 2018 11:00PM | Last Updated: Feb 05 2018 10:55PMसोलापूर : महेश पांढरे 

सध्या सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीसाठीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येण्यासाठी आणि त्यांना एकत्रित आणण्यासाठी वरिष्ठ नेतेमंडळींकडून राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. त्यामुळे या निवडणुकीत  नेतेमंडळी एकत्रित येऊनच निवडणूक लढणार असल्याचे सिद्ध झाले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले असून बाजार समितीच्या स्थापनेपासून ते आजतागायत काँग्रेस पक्षाकडे सत्ता राहिली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बाजार समितीवरील सत्ता अबाधित राहिली पाहिजे यासाठी काँग्रेसची नेतेमंडळी आग्रही राहिली असून यामध्ये दोन्ही तालुक्यांतील     काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन सत्ता कायम राखावी यासाठी दस्तुरखुद्द माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्याचा निर्णय नेतेमंडळींनी घेतला आहे. त्यामुळे आमदार सिद्धाराम म्हेेत्रे, माजी आ. दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे यांच्यात माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांनी समन्वय घडवून आणला आहे. 

दुसरीकडे उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते बळीराम काका साठे यांनी गतवेळच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपसोबत युती केली होती. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीवर भाजपची सत्ता आली आहे. या निवडणुकीत काका साठे यांनी त्यांची भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत ते काँग्रेससोबत राहणार की पुन्हा भाजपसोबत जाणार याविषयी उलटसुलट चर्चा रंगली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर बळीराम काका साठे यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक वडाळा येथे घेतली. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा काका साठे यांनी प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया आल्याने बळीराम साठे यांनी आपला निर्णय अद्याप जाहीर केला नाही, तर योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ, असे आश्‍वासन कार्यकर्त्यांना दिले आहे. दुसरीकडे बळीराम काका साठे यांनी येत्या निवडणुकीत काँग्रेससोबतच राहावे यासाठी काँग्रेसच्या नेतेमंडळींनी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच साकडे घातल्याचे समजते.