Tue, Apr 23, 2019 07:58होमपेज › Solapur › काँग्रेस-राष्ट्रवादीची  आक्रमकता थंडावली

काँग्रेस-राष्ट्रवादीची  आक्रमकता थंडावली

Published On: Jul 12 2018 10:35PM | Last Updated: Jul 12 2018 9:41PMसोलापूर : प्रशांत माने

गेल्या काही महिन्यांपूर्वी केंद्र व राज्यातील सरकारविरोधात आक्रमक झालेली काँग्रेस-राष्ट्रवादी सध्या थंडावल्याचे चित्र आहे. वाढती महागाई, इंधन दरवाढ, शेतकरी कर्जमाफी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आदी विविध कारणांवरुन सरकारला धारेवर धरत रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारे विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी लोकसभा व विधानसभा निवडणूक अवघ्या वर्षाच्या कालावधीवर आली असतानाही सध्या बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे बाजार समिती निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयानंतरही काँग्रेसमध्ये तितकेस उत्साहाचे वातावरण दिसत नाही, हे विशेष आहे.
मध्यंतरीच्या काळात काँगे्रस आपल्या ज्येष्ठ नेत्यांसह सरकारविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होती. तर महापालिकेच्या कारभाराविरोधात युवक काँग्रेससह शहर काँग्रेस तीव्र आंदोलन करत होते. सरकारकडून दलितांवरील अत्याचारात वाढ झाल्याच्या निषेधार्थ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे काँग्रेसचा आंदोलनांचा आवाका वाढेल आणि मतदारसंघातील कार्यक्रमांना जोर चढेल असे वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात टक्कर देऊन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहात अडकलेल्या आणि प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्यानंतरही काँग्रेसने मिळवलेला विजय नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा होता. 

परंतु या विजयाचा जल्लोष म्हणावा तसा दिसून आला नाही. या विजयाचा उत्सव करीत काँग्रेसने विजयी सभा घेऊन कार्यकर्त्यांमधील ऊर्जा कायम राहावी आणि वाढावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, पण तसे झालेले नाही. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेला तगडे आवाहन द्यावयाचे असेल तर काँग्रेसला आक्रमकता सोडून चालणार नाही, हे निर्विवाद आहे. बाजार समिती निवडणूक निकालात मिळालेल्या विजयाचा अभ्यास करुन पुढील रणनीती आखावी लागणार आहे. 

केंद्र  व  राज्यातील सरकारविरोधात महाराष्ट्रभर हल्लाबोल आंदोलन यात्रा करुन पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करणारी राष्ट्रवादी आता शांत दिसत आहे. सोलापुरात झालेली हल्लाबोल सभा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारी होती. परंतु जिल्हाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीत या पदासाठी इच्छुकांची वानवा पाहिल्यानंतर जिल्ह्यातील पक्षाची स्थिती लक्षात येते. 
अद्यापही जिल्हा राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत सर्व काही अलबेल, असे वातावरण नसल्याचे चित्र आहे.राष्ट्रवादी शहराध्यक्षपदासाठी चढाओढ दिसून आली, पण शहरात नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी, अशी स्थिती आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने जिल्हा कार्याध्यक्ष व शहर कार्याध्यक्ष ही नवीन पदे निर्माण केली. शहरातील राष्ट्रवादीची स्थिती खूपच नाजूक आहे. 

गतवर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस नगरसेवकांची संख्या सोळावरुन एकदम चारवर घसरली. हे चार नगरसेवकदेखील स्वयंभू निघाले. कारण राष्ट्रवादीचे जे भरवशाचे उमेदवार होते त्यांना पराभवाला सामोर जावे लागले होते. शहर व जिल्हा राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत मोठी गटबाजी आहे. राष्ट्रवादीने पक्ष निरीक्षक बदलून चांगल्या बदलास सुरुवात केली. पण पक्षाची ताकद खरोखर वाढून बालेकिल्ला असलेला जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीला ताब्यात घ्यावयाचा असल्यास थोरल्या पवारांनी बैठक घेऊन गटबाजी मिटवण्याची गरज आहे अन्यथा राष्ट्रवादीला जिल्ह्यात पुन्हा उभारी घेण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागणार, हे निश्‍चित आहे.