होमपेज › Solapur › काँग्रेसचे दिग्गज घोटाळ्याच्या चक्रव्यूहात

काँग्रेसचे दिग्गज घोटाळ्याच्या चक्रव्यूहात

Published On: May 23 2018 11:35PM | Last Updated: May 23 2018 11:32PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2016 याकालावधीत विविध मार्गांनी 39 कोटी 6 लाख 39 हजार 193 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बाजार  समितीच्या  दिलीप  माने, इंदुमती अलगोंडा, राजशेखर शिवदारे, महादेव चाकोते या  चार  माजी  सभापतींसह  32 जणांवर  जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसचे अनेक दिगगज घोटाळ्याच्या चक्रव्युहात अडकण्याची शक्यता आहे. विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वय 47, रा. कमर्शिअल कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर) यांच्या  फिर्यादीवरून 32 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. विशेष लेखापरिक्षणात पुढील मुद्यावर समिती सदस्य व सचिवांनी गैरव्यवहार केला असल्याचे नमूद केले आहे.

या मुद्यांवर बाजार समितीचा विश्‍वासघात  करून  31  कोटी 39 लाख 9 हजार 392 रुपयांचा गैरव्यवहार केल्याने बाजार समितीची गैरव्यवहाराची रक्‍कम 31  कोटी 39 लाख 9 हजार 392 रुपये व त्यावरील 31 मार्च 2016 पर्यंत दरसाल दर शेकडा 12 टक्क्यांप्रमाणे व्याज 7 कोटी 67 लाख 29 हजार 801 रुपये असा एकूण 39 कोटी 6 लाख 39 हजार 193 रुपयांचे नुकसान केले म्हणून जेलरोड पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

मुद्दे पुढीलप्रमाणे : ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँक मर्या. या बँकेच्या मार्केट यार्ड व सिद्धेश्‍वर पेठ शाखेतील मुदतठेवीत बाजार निधीची गुंतवणूक करताना गुंतवणूक  कालावधी व मिळणारा व्याजदर विचारात घेऊन या बँकेच्या मुदतठेवीमध्ये  गुंतवणूक न करता या बँकेस  फायदेशीर व बाजार समितीचे नुकसान होईल अशारितीने गुंतवणूक केली. एकूण 22 विविध कामांचे बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बाजार समितीचे आर्किटेक्ट यांनी सादर  केले आहे. यापैकी फक्‍त 6 कामे ही निविदेतील  व  करारपत्रातील  अटी व शर्तीप्रमणे मुदतीत पूर्ण केलेली आहेत.

उर्वरित 16 कामे विलंबाने पूर्ण झालेली असून निविदेतील अथवा करारपत्रातील अटींप्रमाणे दंड आकारणी केली नाही. नियमबाह्य भरती केलेल्या रोजंदारी कर्मचार्‍यांनी औद्योगिक न्यायालयामध्ये दाखल केलेल्या खटल्यांची लोकन्यायालयात संगनमताने, तडजोड करुन मागीलदाराने   या कर्मचार्‍यांना बाजार समितीच्या सेवेत खात्याची मान्यता न घेता प्रवेश देऊन गैरव्यवहार केला. बाजार समितीने विसंगत जाहिरात खर्च केला. बाजार शुल्क व देखरेख फी विलंबाने जमा केलेल्या व्यापार्‍यांकडून दंड व्याज आकारणी न केल्यामुळे बाजार समितीचे नुकसान केले. व्यापार्‍यांनी परत  केलेल्या  प्लॉट/गाळ्यांचे लिलाव  न  करता  वाटप केल्याने  बाजार समितीचे नुकसान केले. व्यापारी/आडते यांची बाजार समितीने हिशोब तपासणी न केल्यामुळे बाजार समितीस बाजार शुल्काद्वारे मिळणार्‍या उत्पन्नात झालेल्या गळतीमुळे बाजार समितीचे  नुकसान केले.

बाजार समितीने सन 2011-12 ते 2015-16 याकालावधीत मुख्य बाजार आवारातील मंजूर ले-आऊट, खुल्या जागा, ओट्याच्या जागा, सॅनेटरी ब्लॉकचा रिकाम्या जागा, पॅसेजमधील जागा हितसंबंधातील व्यक्‍तींना नियमबाह्य वाटप करून गैरव्यवहार केला. पणन संचालकांची मंजुरी न घेता कोणतीही निविदा न काढता गाळ्याची वाजवी किंमत न ठरविता गोदामासाठी बांधलेल्या तळघरातील 100 गाळ्यांचे हितसंबंधातील व्यक्तींना दुकाने म्हणून वाटप करून गैरव्यवहार केला. प्रक्रिया विभागाकडील जागेचा राहण्यासाठी गैरवापर केला. बाजार समितीच्या आवारातील व्यापार्‍यांनी केलेल्या अतिक्रमणाच्या जागेचे भुईभाडे वसूल न केल्यामुळे बाजार समितीचे  नुकसान केले. पणन संचालक यांच्या मंजुरीशिवाय नियमबाह्य भरती केलेल्या कर्मचार्‍यांना वेतन व भत्ते, सानुग्रह अनुदान अदा करून केलेल्या गैरव्यवहारामुळे बाजार समितीचे नुकसान केले. पोटभाडेकरू ठेवलेल्या प्लॉट/गाळेधारक व्यापारी अडते यांच्यावर बाजार समितीने कारवाई न केल्यामुळे बाजार समितीचे नुकसान केले.

1 एप्रिल 11 ते 17 ऑक्टोबर 11 मधील समिती सदस्य व सचिव ः-
सभापती इंदुमती परमानंद अलगोंडा (रा. वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर), उपसभापती बाळासाहेब भीमाशंकर शेळके (रा. नांदणी, ता. दक्षिण सोलापूर), सदस्य महादेव बाबुराव चाकोते (रा. जोडभावी पेठ, सोलापूर), दिलीप ब्रम्हदेव माने (रा. तिर्‍हे, ता. उत्तर सोलापूर), नागराज कल्याणराव पाटील (रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर), शंकर नागनाथ येणगुरे (रा. कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर), ऊर्मिला रावसाहेब शिंदे (रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर), अविनाश श्रीधर मार्तंडे (रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर), रजाक शेख अहमद निंबाळे (रा. होनमुर्गी, ता. दक्षिण सोलापूर), धोंडीराम नारायण गायकवाड (रा. बक्षीहिप्परगे, ता. दक्षिण सोलापूर), महादेव आणप्पा पाटील (रा. कुडल, पो. बरूर, ता. दक्षिण सोलापूर), आप्पासाहेब शिवशंकर उंबरजे (रा. रमणशेट्टीनगर, शेळगी, सोलापूर), प्रभाकर गंगाधर विभुते (रा. स्टेट बँक कॉलनी, भवानी पेठ, सोलापूर), दगडू भगवान जाधव (रा. दोड्डी, ता. दक्षिण सोलापूर), सचिव डी. व्ही. कमलापुरे (रा. सोलापूर).

18 ऑक्टोबर 11 ते 17 ऑक्टोबर 16 मधील सदस्य व सचिव -
सभापती दिलीप ब्रम्हदेव माने (रा. तिर्‍हे, ता. उत्तर सोलापूर), उपसभापती राजशेखर वीरपाक्षप्पा शिवदारे (रा. इंगळगी, ता. दक्षिण सोलापूर), सदस्य केदार बाबुराव विभुते (रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर), राजेंद्र लक्ष्मण गुंड (रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर), प्रवीण विष्णूपंत देशपांडे (रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर), सिध्दाराम बाबुराव चाकोते (रा. सरस्वती निवास, जोडभावी पेठ, सोलापूर), सोजर शिवराम पाटील (रा. दोड्डी, ता. दक्षिण सोलापूर), इंदूमती परमानंद अलगोंडा (रा. वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर), शांताबाई जगन्नाथ होनमुर्गीकर (रा. दर्गनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर), उत्तरेश्‍वर अंबादास भुट्टे (रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर), बाळासाहेब भीमाशंकर शेळके (रा. नांदणी, ता. दक्षिण सोलापूर), अशोक आनंदराव देवकते (23 सप्टेंबर 2013 पासून सदस्य)(रा. राजूर, औराद, ता. दक्षिण सोलापूर), अविनाश श्रीधर मार्तंडे (रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर), पिरप्पा गुरुसिध्द म्हेत्रे (रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर), श्रीशैल गुलचंद गायकवाड (रा. वळसंग, ता. दक्षिण सोलापूर), चंद्रकांत आमसिध्द खुपसंगे (रा. सादेपूर, निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर), नसीरअहमद महिबुबसाब खलिफा (रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर), बसवराज निलप्पा दुलंगे (रा. जोडभावी पेठ, सोलापूर), हकीद महमद शेख (रा. नई जिंदगी चौक, सोलापूर), सिद्रामप्पा गुरुसिध्दप्पा यारगले (रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर), सचिव डी. व्ही. कमलापुरे (29 फेब्रुवारी 2016 पर्यंत)(रा. सोलापूर), सचिव यु. आर. दळवी (1 मार्च 2016 ते 31 मार्च 2016 पर्यंत).