Fri, Aug 23, 2019 14:27होमपेज › Solapur › अधिकार्‍यांच्या गावात तंटामुक्‍त समितीच्या अध्यक्ष निवडीतच तंटा

अधिकार्‍यांच्या गावात तंटामुक्‍तच्या अध्यक्ष निवडीतच तंटा

Published On: Aug 25 2018 8:51AM | Last Updated: Aug 25 2018 8:55AMमाढा : तालुका प्रतिनिधी

माढा तालुक्यातील अधिकार्‍यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या उपळाई बुद्रुक या गावात तंटामुक्‍त समिती अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गावातील गटांतर्गत समेट न झाल्याने मोठा तंटा निर्माण झाला होता. या गावात २ आयएएस ,१ आय. पी. एस, १ आय आर. एस. यांच्यासह आरटीओ ,पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, असे पन्नास हून अधिक अधिकारी आहेत. 

उपळाई बुद्रुक याठिकाणी तंटामुक्‍त समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीकरिता सरपंच संजय नागटिळक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गावकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तंटामुक्‍त समितीच्या अध्यक्षपदासाठी संतोष गायकवाड यांनी मल्लिकार्जुन झाडबुके यांचे, तर लक्ष्मण जाधव यांनी शशिकांत उर्फ दीपक देशमुख यांचे नाव सूचविले. यानंतर याठिकाणी जमलेल्या गर्दीकडून मोठ्या प्रमाणात गोंधळाला सुरुवात झाली. या गोंधळातच मल्लिकार्जुन झाडबुके यांची निवड झाल्याचे त्यांच्या समर्थकांनी जाहीर करत गावात फटाक्यांची आतषबाजी केली. 

दरम्यान, दुसर्‍या दीपक देशमुख गटाने ग्रामपंचायतीत ठिय्या मांडला. यानंतर ग्रामसेवक प्रकाश सावंत यांनी दीपक देशमुख यांना यासंदर्भातील सर्व हकीकत वरिष्ठांना कळविली जाईल. याठिकाणी गोंधळात एक अर्ज दाखल झाला. त्यानंतर अध्यक्षांनी यावर काय निर्णय घेतला, मला माहित नाही, अशा प्रकारचे लेखी दिल्यानंतर देशमुख गटाने ठिय्या मागे घेतला.

याठिकाणी गत अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पंधरा जागांंपैकी सीताराम गायकवाड गटास सात, दीपक देशमुख गटास पाच, तर दादासाहेब नागटिळक गटास तीन जागा मिळाल्या होत्या. कोणालाही बहुमत न मिळाल्याने गायकवाड व देशमुख हे गट एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. सुरुवातीला अडीच वर्षे सरपंचपद हे गायकवाड यांच्याकडे होते. त्यानंतर गायकवाड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बर्‍याच राजकीय घडामोडी घडल्या. गेल्या महिन्यात झालेल्या सरपंचपदाच्या  निवडणुकीत  गायकवाड व नागटिळक हे एकत्र आले. याच राजकीय घडामोडीचे पडसाद या तंटामुक्‍त समितीच्या निवडणुकीत उमटले. यावेळी सपोनि दत्तात्रय निकम यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

यासंदर्भात सभेचे अध्यक्ष तथा सरपंच संजय नागटिळक म्हणाले की, तंटामुक्‍त समितीच्या अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन झाडबुके व शशिकांत देशमुख यांचे अर्ज दाखल होते. यानंतर चारित्र्य पडताळणी दाखल्यासंदर्भात मी विचारणा केली असता मल्लिकार्जुन झाडबुके यांनी दाखला सादर केला. देशमुख यांनी हा दाखला नसल्याचे सांगितले. त्यानंतर आणखी कोणी इच्छुक आहेत का, याची विचारणा केली. त्यानंतरच झाडबुके यांची निवड जाहीर केली.