Tue, May 21, 2019 04:34होमपेज › Solapur › भीमेच्या खोर्‍यात पावसाच्या विश्रांतीने चिंता

भीमेच्या खोर्‍यात पावसाच्या विश्रांतीने चिंता

Published On: Aug 04 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 10:32PMपंढरपूर : प्रतिनिधी

जुलै महिना संपत असतानाच भीमेच्या खोर्‍यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे 19 पैकी 12 धरणांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा झालेला आहे. ऑगस्ट महिन्यातही पाऊस कमी पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यामुळे आता परतीच्या पावसावरच भिस्त अवलंबून असल्याचे दिसते आहे. 

यंदाचा पावसाळा सुरू होऊन 2 महिने संपत आहेत. ऑगस्ट महिना सुरू होत असताना गतवर्षी 3 ऑगस्ट रोजी भीमा आणि नीरा नदीच्या खोर्‍यातील धरणातील पाणीसाठ्याची तुलना केली असता गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी 3 ऑगस्टपर्यंत दोन्ही नदीच्या खोर्‍यांमध्ये असलेल्या पाणीसाठ्याची तुलना करता यंदा तब्बल 12 धरणांमध्ये कमी पाणीसाठा झालेला आहे. नीरा नदीच्या खोर्‍यातील पावसाचे प्रमाण आणि पाणीसाठा गतवर्षीच्या पातळीवर आहे. ही  समाधानाची बाब असली तरीही भीमा नदीच्या खोर्‍यातील 19 पैकी 12 धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा यंदा कमी पाणी असल्याचे दिसून येते. 

नीरा नदीच्या खोर्‍यात आलेल्या वीर धरणात गेल्यावर्षी एवढाच म्हणजे 91 टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे. गुंजवणी 61 टक्के भरले असून भाटघर आणि नीरा देवघर या दोन्ही धरणांतील पाणीपातळी गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक आहे.  दुसर्‍या बाजूला भीमा नदीच्या खोर्‍यात मात्र यंदा पावसाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र असून खडकवासला, पानशेत, आंध्रा, कळमोडी ही 4 धरणे 10 टक्के भरलेली आहेत, तर वरसगाव (81), मुळशी (90), कासारसाई (91.66), पवना (87.76), भामा आसखेड (81.93),  चासकमान (97.07), घोड (33),  डिंभे (84), वडज (55.54), येडगाव (69.64), माणिकडोह (42.18), पिंपळगाव जोगे (31.71),  उजनी (34.54) टक्के ही धरणे मागील वर्षीपेक्षा यंदा कमी भरलेली आहेत.  मागील पंधरा ते 20 दिवसांपासून नीरा, भीमेच्या खोर्‍यात पावसाने उघडीप घेतल्यामुळे हा परिणाम झालेला आहे. 

3 ऑगस्ट 2017 पर्यंत भीमा आणि नीरा नदीच्या खोर्‍यात झालेल्या पावसाचे प्रमाणही यावर्षीच्या तुलनेत जास्त होते. त्यामुळे धरणांची पाणीपातळी जास्त होती. त्या तुलनेत यंदा पाऊस कमी असून ऑगस्ट महिन्यातही पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात पुरेशा प्रमाणात पाऊस नाही झाला तर उजनीसारखी मोठी धरणे भरण्यासाठी आता परतीच्या दमदार पावसाचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.  

नीरा नदीच्या खोर्‍यात समाधानकारक पाऊस
नीरा नदीच्या खोर्‍यात आलेल्या वीर धरणात गेल्यावर्षी एवढाच म्हणजे 91 टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे. गुंजवणी 61 टक्के भरले असून भाटघर आणि नीरा देवघर या दोन्ही धरणांतील पाणीपातळी गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक आहे. 

गतवर्षीपेक्षा उजनीत 20 टक्के पाणीसाठा कमी सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण यावर्षी 20 टक्के कमी भरलेले आहे. गतवर्षी 3 ऑगस्ट रोजी उजनीमध्ये 54.50 टक्के एवढा पाणीसाठा होता, तर यंदा 34. 54  टक्के एवढे पाणी जमा झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी उजनी धरणाची पातळी उणे 31 टक्क्यांपर्यंत कमी झाली होती. यावर्षी हे प्रमाण जेमतेम उणे 20 टक्के झाले होते. तसा विचार केल्यास यंदा  उणे 31 टक्के एवढा पाणीसाठा झालेला आहे, असे दिसते. नीरा-भीमा खोर्‍यातील उजनी हे सर्वाधिक  क्षमतेचे धरण असल्यामुळे हे धरण भरले की सोलापूर जिल्ह्यातून शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त होत असते.