Fri, Jul 19, 2019 19:50होमपेज › Solapur › पंढरीतील पालखी तळांचे रूपडे पालटले

पंढरीतील पालखी तळांचे रूपडे पालटले

Published On: Jul 19 2018 1:40AM | Last Updated: Jul 18 2018 9:00PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रेसाठी पंढरीकडे निघालेले संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे आता पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर आलेले असून उद्या (शुक्रवार, 20 रोजी) दोन्ही संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहेत. त्याअनुषंगाने वाखरी, भंडीशेगाव आणि पिराचीकुरोली या तीनही पालखी तळावरील सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून गेल्या वर्षभरात या तीनही तळांवर विविध विकासकामे पूर्ण झाल्यामुळे पालखी सोहळे, दिंड्या आणि फडातील वारकर्‍यांचीही चांगली सोय झालेली आहे. 

सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून शेकडो संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. 23 जुलै रोजी आषाढी यात्रा साजरी होत असून पालखी सोहळे आता पंढरपूर तालुक्याच्या जवळपास पोहोचलेले आहेत. संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका, यांच्यासह देहू, आळंदीपासून निघालेल्या हजारो दिंड्यांचे उद्या (शुक्रवारी) पंढरपूर तालुक्यात आगमन होत आहे. यावर्षी पालखी सोहळ्यासोबत भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून त्या गर्दीचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे. शुक्रवारी संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा भंडीशेगाव येथे तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराचीकुरोली येथे मुक्कामी येणार आहेत. तालुक्यातील पहिल्याच मुक्कामी दोन्ही सोहळे आणि त्यांच्यासोबत इतरही संतांच्या पालख्या सोबत आहेत. 

पिराचीकुरोली येथील पालखी तळावर यंदा पंढरपूर, देहू, आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून 10 हायमास्ट दिवे, अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण, मुरूमीकरण, दोन स्वागत कमानी, पिण्याच्या पाण्याचे स्टँडपोस्ट कायमस्वरूपीच्या स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. पहिल्यांदाच पालखी तळावर 10 हायमास्ट दिवे उभा केल्यामुळे संपूर्ण पालखी तळ शुभ्र प्रकाशात न्हाऊन निघाले आहे. पिण्याच्या पाण्याची यंदा मुबलक उपलब्धता असून बाजूच्या शेतकर्‍यांनीही आपल्या विहिरी, बोअरच्या पाण्यावर स्टँडपोस्ट तयार करून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.  पालखी तळावर कायमस्वरूपीची 20 शौचालये आहेत  आणि 500 फॅब्रिकेटेड शौचालये उभी करण्यात येत आहेत. 

भंडीशेगाव येथील पालखी तळावर यावर्षी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून 2 भव्य स्वागत कमानी उभ्या करण्यात आल्या आहेत. 6 ठिकाणी हायमास्ट दिवे उभे केले आहेत. पूर्वीचे दोन दिवे हायमास्ट दिवे असल्यामुळे या तळावर एकूण 8 दिवे उभे राहिले आहेत. यंदा तळावर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी दगडी चौथरा तयार करण्यात आला आहे तसेच समोरच्या बाजूने फरशीकरण करण्यात आलेले आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, माहिती केंद्र उभारणी करण्यात आले आहे. भंडीशेगाव येथे संत  सोपानकाका, संत चौरंगीनाथ महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालख्याही मोठ्या संख्येने मुक्कामी असतात. या सर्व पालख्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झालेली आहे.

वाखरी येथील पालखी तळावर 21 जुलै रोजी संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज यांच्यासह राज्यभरातून विविध संतांच्या पालख्या येत आहेत. त्यादिवशी येथील तळावर 2 ते 3 लाख भाविकांचा मुक्काम असतो. त्याअनुषंगाने पालखी तळावर विद्युतीकरण, स्वच्छता, 840 कायमस्वरूपी शौचालये उभारण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीच्यावतीने पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र सोय केली असून नगरपालिकेनेही या तळावर पिण्याचे पाणी स्वच्छतेचे काम केले आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या विसाव्याचे चौथरे आणि मेघडंबरीची दुरूस्तीही करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने नागरीसुविधा केंद्र उभे करण्यात आले असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या तळावरूनच सर्व संतांच्या पालख्या दशमीच्या दिवशी (22 जुलै रोजी) पंढरीकडे निघत असतात. त्यांच्यासोबत त्यांची वाहनेही पंढरीकडे जात असल्यामुळे वाहनांची कोंडी होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिस बंदोबस्त, वाहतूक शाखेचे पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत. राज्य सरकारच्यावतीने पंढरपूर, आळंदी, देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून या तीनही पालखी तळांवर कायमस्वरूपाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. 

प्रांताधिकार्‍यांचे विशेष लक्ष

तीनही पालखी तळांवरील सुविधा आणि विकासकामांकडे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी विशेष लक्ष दिले असून दर दोन-तीन  दिवसांनी त्यांनी पाहणी दौरा काढून कामांची पूर्तता करून घेतली आहे. बुधवारी सकाळीही ढोले यांनी पालखी तळांची पाहणी करून अपूर्ण राहिलेल्या कामांसंदर्भात ग्रामपंचायत आणि महसूल विभागाला सूचना केल्या आहेत.