होमपेज › Solapur › तातडीने 5000 शेततळी पूर्ण करा : डॉ. म्हैसेकर

तातडीने 5000 शेततळी पूर्ण करा : डॉ. म्हैसेकर

Published On: May 18 2018 12:34AM | Last Updated: May 18 2018 12:17AMपुणे : प्रतिनिधी

पुणे महसूल विभागातील जलयुक्‍त शिवार अभियानात सुरू असलेली सर्व कामे पावसाळ्यापूर्वी व वेळेत पूर्ण करावीत. पुणे विभागाला 17  हजार 320 शेततळ्यांचे लक्ष्यदिले होते. त्यापैकी 11 हजार 906 शेततळी पूर्ण झाली असून, शिल्लक 5 हजार 414 शेततळी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील जलयुक्‍त शिवार अभियानातील कामांचा आढावा विभागीय आयुक्‍त कार्यालयात घेण्यात आला.

यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सातार्‍याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, सांगली जिल्हा परिषदेचे मुुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपायुक्‍त अजित पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटी यांच्यासह विभागातील जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागात जलयुक्‍त शिवार अभियानात सन 2017-18 मध्ये एकूण 823 गावांची निवड करण्यात आली होती. प्रस्तावित केलेल्या 27 हजार 200 कामांपैकी 14 हजार 211 कामे पूर्ण झाली असून, 7 हजार 73 कामे प्रगतिपथावर आहेत. सर्व कामांवर 95 कोटी 45 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. 2018-19 साठी जलयुक्‍त शिवार अभियानात पुणे जिल्ह्यात 219 गावे, सातारा 90 गावे, सांगली 92 गावे, सोलापूर 118 आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी 80 गावांची निवड झाली असून, या गावांचा आराखडा तयार करून ग्रामसभेची लवकरात लवकर मंजुरी घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी दिले. या कामांसाठी 154 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, निधीची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.