Tue, Jul 16, 2019 01:38होमपेज › Solapur › ग्रामपंचायत अधिनियम कायद्याची पायमल्ली केल्याची तक्रार

ग्रामपंचायत अधिनियम कायद्याची पायमल्ली केल्याची तक्रार

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 10:18PMवैराग : प्रतिनिधी 

तडवळे येथील ग्रामपंचायत निवडणुकीवेळी अपत्यांबाबतचे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायद्याची पायमल्ली केल्याची तक्रार मेजर संजय आवारे यांनी केली होती. त्यानुसार रिता रामकृष्ण लोखंडे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार  रद्द करण्यात आले आहे. हा निकाल तडवळे ग्रामपंचायतीबाबतचा असला तरी अनेक गावांमध्ये अशा तक्रारी असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, 2015-16 मध्ये पार पडलेल्या तडवळे ग्रामपंचायत निवडणुकीवेळी प्रभाग क्रमांक एकमधून रिता रामकृष्ण लोखंडे यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये त्या विजयीही झाल्या. दरम्यान, त्यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी सादर केलेल्या नामनिर्देशन पत्रात घोषित केलेली माहिती खोटी देऊन निवडून आल्याची तक्रार संजय आवारे यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसह तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. यामध्ये त्यांनी रिता लोखंडे यांना दोन नव्हे तर तीन अपत्य असून ही माहिती लपवण्यात आल्याचे म्हटले आहे. याबाबतचे पुरावेही त्यांनी तक्रारी सोबत देऊ केले आहेत. 12 सप्टेंबर 2001 नंतर एकूण मुलांच्या संख्येत भर पडून ती दोनपेक्षा अधिक झाल्यास सदस्य पद रद्द केले जाऊ शकते, या धर्तीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1) चे पोट कलम (ज-1) अन्वये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने रिता रामकृष्ण लोखंडे यांचे सदस्यत्व रद्द ठरवले आहे. तडवळे गावासह तालुक्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून लोखंडे यांची ओळख आहे. या निकालामुळे त्यांना राजकीय वाटचालीमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे.

यापूर्वी रिता लोखंडे यांनी पंचायत समितीचे सदस्यत्व, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यत्व, संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षा अशी पदे उपभोगली आहेत. 2015-16 च्या ग्रामपंचायत निवडणुकीवेळी चुरशीचे मतदान होऊन नऊ जागांपैकी तीन -तीन -तीन अशा जागा  समान पद्धतीने तीनही प्रमुख गटांना मतदारांनी निवडून दिल्या होत्या. त्यामुळे गावातील राजकारण संवेदनशील बनले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल धक्कादायक समजला जात असून नवी समीकरणं उदयास येण्याची शक्यता आहे. या तक्रारी अगोदर स्वतंत्र खात्यातून निवडणूक खर्च न दाखवल्या प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. अपत्यांबाबतचा हा निर्णय कलाटणी देणारा असल्याने जिल्ह्यात खळबळ माजवणारा ठरेल.

Tags : Solapur, Complaint, Gram Panchayat, Act