Thu, Apr 25, 2019 21:23होमपेज › Solapur › ‘आत्महत्या’ करतो म्हणणार्‍या ठेकेदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार

‘आत्महत्या’ करतो म्हणणार्‍या ठेकेदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार

Published On: Feb 19 2018 10:54PM | Last Updated: Feb 19 2018 10:22PMसोलापूर : प्रतिनिधी

गेल्या कित्येक दिवसांपासून आयुक्‍तालयामध्ये काम केलेल्या कामाचे  पैसे  न  मिळाल्याने  वैतागलेल्या ठेकेदाराने ‘आत्महत्या’ करतो म्हणाल्याच्या कारणावरून कार्यालय अधीक्षकांनी  ठेकेदाराविरुद्ध सदर  बझार  पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून त्यावर पोलिस ठाण्याकडून ठेकेदाराचा जबाबसुध्दा घेण्यात आला आहे.

आयुक्‍तालयामध्ये केवळ अधिकार्‍यांच्या तोंडी सूचनेवर काम करूनसुध्दा गेल्या कित्येक महिन्यांपासून ठेकेदारांची लाखो रुपयांची  बिले  थकली  आहेत.  त्यामुळे आयुक्‍तालयामध्ये कोणताही ठेकेदार काम करण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच  आयुक्‍तालयातील माहिती कक्षातील संगणक संच अनेक दिवस बंद  होता. अखेर  याबाबत दै. ‘पुढारी’ मध्ये वृत्त प्रसिध्द  होताच खासगी संगणक तज्ज्ञांना बोलावून तत्काळ दुसरा संगणक बसविण्यात आला. 

आयुक्‍तालयामध्ये विविध साहित्यांची   दुरुस्ती,  स्टेशनरी  साहित्य,  मंडप,  इमारत  दुरुस्तीचे  काम  खासगी ठेकेदारांमार्फत करुन घेण्यात येते. या ठेकेदारांना अधिकार्‍यांकडून बर्‍याचवेळा तोंडी आदेश देऊन लागणारे साहित्य मागविण्यात येते. एकदा का साहित्य आले की त्यानंतर याबाबतचा लेखी आदेश ठेकेदारांना दिलाच  जात  नाही. त्यानंतर  ठेकेदारांनी दिलेल्या साहित्याचे बिल मागितले तर प्रशासनाकडून ठेकेदारांना साहित्य मागविल्याबाबतचा आदेश दिला आहे का? याची विचारणा करीत बिल देण्यात येत नाही. असा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याच्या प्रतिक्रिया  ठेकेदारांमधून व्यक्‍त करण्यात येत आहेत. 

आयुक्‍तालयातील याच कार्यपध्दतीला वैतागलेल्या एका ठेकेदाराने कार्यालयीन अधीक्षकांशी बोलताना ‘बिल मिळत नसेल तर आत्महत्या  करू का’ असे विचारले होते. त्यामुळे  कार्यालयीन अधीक्षकांनी सदर  बझार  पोलिस  ठाणे गाठून याबाबत ठेकेदाराविरुद्ध तक्रार अर्ज दिला. त्यावर अर्जावर पोलिस ठाण्याकडूनही तत्काळ कार्यवाही होत ठेकेदाराचा जाबजबाब घेण्यात आल्याचे समजते. 

अधिकार्‍यांचीही लेखी आदेश देण्याची जबाबदारी

आयुक्‍तालयामध्ये खासगी ठेकेदारांमार्फत कामे करुन घेतली जातात व लागणारे साहित्यही मागविण्यात येते. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून खासगी ठेकेदारांना फोन करुन तात्काळ साहित्य देण्याचे तोंडी आदेश देण्यात येतात. परंतु नंतर त्याचे लेखी आदेश देण्यात येत नाहीत. ज्यावेळी बिल देण्याची वेळ येते त्यावेळी लेखी आदेशाबाबत प्रशासनाकडून विचारणा करण्यात येते. त्यावेळी या ठेकेदारांना मात्र तोंडी आदेश देणार्‍या अधिकार्‍यांकडूनही कसल्याही प्रकारची मदत करण्यात येत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनीही कोणतेही साहित्य अगर काम करण्याबाबतचा लेखी आदेश देण्याचीही जबाबदारी ओळखून लेखी आदेश द्यावा, अशी अपेक्षा ठेकेदारांमधून व्यक्त होत आहे.