Thu, Jun 27, 2019 09:38होमपेज › Solapur › संस्थेविरुद्ध तक्रार करणार्‍या शिक्षकाला मारहाण

संस्थेविरुद्ध तक्रार करणार्‍या शिक्षकाला मारहाण

Published On: Jun 21 2018 1:18AM | Last Updated: Jun 20 2018 10:37PMसोलापूर : प्रतिनिधी 

शिक्षण संस्थेतून काढून टाकल्यामुळे संबंधित संस्थेवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या शिक्षकास प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या चेंबरमध्येच अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात घडला. या मारहाणप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे दोन सदस्य यांच्यासह अनोळखी तिघे अशा सहाजणांवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

विनायक अशोक गायकवाड (वय 38 रा. शहानगर हौसिंग सोसायटी, वांगी रोड) यांच्या तक्रारीवरून शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने व नितीन नकाते आणि अन्य तिघाजणांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विनायक गायकवाड हे भैरू वस्तीतील मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संस्थेच्या सुशील मराठी प्राथमिक शाळेमध्ये 2000 ते 2012 सालापर्यंत अप्रशिक्षित शिक्षक या पदावर कार्यरत होते. संस्थेने कोणतेही लेखी आदेश न देता तोंडी सांगून त्यांना काढून दुसर्‍या व्यक्‍तीची नेमणूक केली. झालेल्या अन्यायामुळे त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. संस्थेच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी म्हणून राज्य पुणे शिक्षण संचालकांकडे तक्रार दाखल केली. शिक्षण संचालकांकडून आलेल्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. त्या समितीने चौकशी करुन तक्रारीत तथ्य असल्याचे सांगून पुढील कार्यवाही करा, असा अहवाल शिक्षणाधिकारी राठोड यांनी दिला. त्यानंतरही विनायक गायकवाड  यांना प्रत्यक्षात न्याय मिळत नव्हता. 

प्रशासन अधिकारी जगताप यांच्या सांगण्यावरून विनायक गायकवाड हे  सोमवारी साडेचार वाजता शिक्षणाधिकार्‍यांच्या चेंबरमध्ये गेले. त्याठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, नितीन नकाते हजर होते. यावेळी शिक्षणाधिकारी राठोड यांनी गायकवाड यांना अरेरावीची आणि उद्धट भाषा वापरली. माहिती देण्यास टाळाटाळ केली. यावर गायकवाड यांनी आमच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठीच आपणास शासनाने बसवले असल्याचे राठोड यांना उत्तर दिले. याचवेळी राठोड आणि माने यांनी फोन करुन सहकार्‍यांना चेंबरमध्ये बोलावून घेतले. राठोड, सुभाष माने, नकाते आणि अन्य तीनजणांनी संगनमत करुन शिवीगाळ, दमदाटी करुन हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यात विनायक गायकवाड याच्या सर्वांगास मुक्‍कामार लागला. त्यातच राठोड आणि माने याने मारलेल्या ठोश्यामुळे गायकवाडच्या तोंडातील चार दात निखळल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे तसेच खालील ओठास  जखम होऊन डोळ्यास मार लागल्याचे म्हटले आहे. तपास पोलिस हवालदार एस. एस. वाघमारे करीत आहेत.