Tue, Jun 02, 2020 23:48होमपेज › Solapur › विठ्ठलराव शिंदे कारखाना येथे ६१ जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

विठ्ठलराव शिंदे कारखाना येथे ६१ जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 10:59PMटेंभुर्णी : प्रतिनिधी 

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी 6 वा.24 मि. या गोरज मुहूर्तावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 61 जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला.  

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगाव (टें) व माढेश्‍वरी अर्बन बँक यांच्या सहयोगातून माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोरज मुहूर्तावर 61 वधू-वर जोडप्यांचे विवाह थाटात पार पडले.

या विवाह सोहळ्यातील नववधू वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी चिंचगाव टेकडी येथील प.पू. रामानंद सरस्वती महाराज, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, कुर्डुवाडी येथील उपविभागीय अधिकारी मारुती बोरकर, कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे, सुनंदाताई बबनराव शिंदे, प्रणितीताई रणजितसिंह शिंदे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, नंदाताई सुर्वे, संचालक वामनराव उबाळे, बबनराव पाटील, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक भाई शिवाजी पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, माढेश्‍वरीचे व्हा. चेअरमन अशोक लुणावत, सर्जेराव बागल, पोपट गायकवाड, प्रा.जी. के. देशमुख, वेताळा जाधव, सुहास पाटील-जामगावकर, सुरेश बागल, कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. एस. रनवरे, कारखान्याचे सचिव सुहास यादव, हिम्मत सोलनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. बबनराव शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत केले.  आ. शिंदे यांनी सांगितले की, गेल्या 14 वर्षांपासून मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून 2004 पासून सुरू झालेल्या विवाह सोहळ्यात आतापर्यंत 1 हजार 450 जोडप्यांचे विवाह झाले आहेत. या मोफत विवाह सोहळ्यात विवाह होणार्‍या मागासवर्गीय जोडप्यांना शासनाकडून 20 हजार रुपये अनुदान देण्यात येते. तर इतर जोडप्यांना 10 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.

ज्या जोडप्यांनी एक किंवा दोन मुलीवर कुटुंब नियोजन केले आहे.अशा मुलींना माढेश्‍वरी अर्बन बँक दत्तक घेऊन त्यांच्या उच्च शिक्षणासाठी नियोजन करीत आहे. तसेच विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, माढेश्‍वरी अर्बन बँक, विठ्ठलराव शिंदे सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिरात सुमारे 4 हजार रुग्णांना दृष्टी देण्याचे काम पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी केले आहे. त्याप्रमाणे 13 हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत काशियात्रा घडविली आहे.
 

यावेळी प.पू. रामानंद सरस्वती महाराज यांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद देताना नवदांपत्याना वैवाहिक जीवन सुखी, समाधानी राहावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी विवाहापूर्वी सर्व वरांची ट्रॅक्टरमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच वधूस शालू, मणीमंगळसूत्र, तर वरास सफारी ड्रेस व इतर साहित्य देण्यात आले होते. विवाहासाठी मोठा मंडप तयार करण्यात आला होता. विवाहाचे पौरोहित्य सुरेश पाठक यांनी केले. दुसर्‍या बाजूला वर्‍हाडी मंडळींसाठी सकाळी 10.30 पासून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र जाधव यांनी केले.