Sun, Aug 25, 2019 12:22होमपेज › Solapur › क्रांतिदिनी कम्युनिस्टांचे जेलभरो

क्रांतिदिनी कम्युनिस्टांचे जेलभरो

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 10:19PMसोलापूर : प्रतिनिधी

क्रांतीदिनी सरकारविरोधात घोषणा देत  सिटू, अखिल भारतीय किसान सभा, माकप, एसएफआय, आशा वर्कर यांनी गुरुनानक चौकात रास्तो रोको आंदोलन करत जेलभरो आंदोलन केले. 9 ऑगस्ट हा क्रांतीदिन असून सरकारच्या धोरणांविरोधात भारतामध्ये अजून एक क्रांती होणे गरजेचे आहे, असे आलेल्या सर्व कम्युनिस्टांनी रस्त्यावर ठिय्या करून सांगितले.

गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास गुरुनानक चौकात  माकप, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, विडी कामगार महिला, आशा वर्कर महिला, सिटू, अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी गुरुनानक चौकातून कुमठा नाका दिशेने जाणार्‍या मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी अ‍ॅड. एम.एच. शेख यांनी प्रथम भाषण केले. केंद्रात कितीही सत्ता परिवर्तने झाली तरी काहीही उपयोग नाही. सरकारने धोरणात बदल केला पाहिजे, असे आपल्या मनोगतातून सांगितले.

माजी आमदार नरसय्या आडम यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, भारतामध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जेलभरो आंदोलन केले जात आहे. भारतात सद्यपरिस्थितीला  प्रत्येक समाजाने आरक्षण मागणीचे हत्यार उपसले आहे. हे सरकारच्या अविकसित कामामुळे व अविकसित धोरणामुळे अशी विदारक  परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक समाज मागास  होत चालला आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. उच्च शिक्षण घेण्यासाठी आरक्षणाचा आधार घेऊ, असा विचार लोकांत आला आहे. हे सरकार खोटारडे सरकार आहे. 4  वर्षांत 8 कोटी लोकांना रोजगार किंवा नोकरी मिळणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही. शेतकरीवर्ग आत्महत्या करण्यास  फक्त सरकार जबाबदार आहे. 

मराठा समाज, मुस्लिम समाज यांना आर्थिक आरक्षण मिळालेच पाहिजे. निरव मोदी, विजय मल्ल्या आदींनी भारतावर दरोडा घालून पळून गेले. या सरकारच्या काळात बलात्कार वाढले. काय चालू आहे देशात. हा देश रामाचा आहे. रामराज्यातदेखील एवढे अत्याचार झाले नाहीत, असे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

या आंदोलनात दत्ता कांबळे, व्यंकटेश कोंगारी, सिध्दप्पा कलशेट्टी,  अनिल वासम, इलियास सिध्दीकी, नसीमा शेख, कामिनी आडम, नलिनी कलबुर्गी आदी महिला व पुरुष कम्युनिस्ट कार्यकर्ते उपस्थित होते.

भविष्यात रे-नगरसाठी सोलापूर ते मुंबई पायी जाणार
भविष्यात रे-नगरसाठी सोलापूर ते मुंबई चालत जाणार. दोन लाख सबसिडी घेतल्याशिवाय राहणार नाही. रे-नगरसाठी 30 हजार लोकांनी अर्ज केला आहे. त्या तीस हजार लोकांना घेऊन जाणार, अशी माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी रास्ता रोको आंदोलनावेळी सांगितली. रे-नगरसाठी अर्ज केलेल्या महिला मोठ्या संख्यने क्रांतीदिनाच्या या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.