Fri, Apr 26, 2019 15:21होमपेज › Solapur › शेतमाल तारण योजना, आज धनादेश वाटप

शेतमाल तारण योजना, आज धनादेश वाटप

Published On: Jan 15 2018 1:45AM | Last Updated: Jan 14 2018 9:32PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना तारण कर्जाच्या धनादेशाचे वाटप सोमवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वितरण करण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बाजार समितीचे सचिव विनोद पाटील उपस्थित होते. 

बाजार समितीच्या मार्केट यार्डातील कै.वि.गु. शिवदारे सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास महापौर शोभा बनशेट्टी, दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील, उत्तर पंचायत समितीच्या सभापती संध्याराणी पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी आदी उपस्थित राहणार आहेत. 

शेतमाल तारण योजनेंतर्गत शेतकर्‍यांना बाजारभावाच्या दरानुसार मालाच्या किंमतीच्या 75 टक्केपर्यंत कर्ज 6 टक्के दरसाल शेकडा या व्याजदराने देण्यात येत आहे. या योजनेचा 189 शेतकर्‍यांनी लाभ आतापर्यंत घेतला आहे. या उपक्रमातून या शेतकर्‍यांचा 63 लाख 81 हजार रुपयांचा माल तारण स्वरुपात ठेवण्यात आला आहे. या योजनेत सहभागी झालेल्या 20 शेतकर्‍यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जाच्या धनादेशाचे वाटप जाहीर कार्यक्रमात करण्यात येत आहे. 

बाजार समितीत सुरु करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्रात 511 शेतकर्‍यांचा 2408 क्‍विंटल उडीद, सोयाबीन व मूग आधारभूत दराने खरेदी करण्यात आली आहे. या शेतकर्‍यांसाठी एकूण 1 कोटी 20 लाख रुपयांची रक्‍कम शासनाकडून देय असून पहिल्या टप्प्यात सोमवारी 54 लाख रुपयांची रक्‍कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर देण्यात येत असल्याची माहिती प्रशासक काकडे यांनी दिली.  तूर उत्पादक शेतकर्‍यांचे आधारभूत दराने खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांची नोंदणी करुन घेण्यात येत आहे. मात्र शेतमाल तारण योजनेतून शेतकर्‍यांना तातडीने कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे शेतकर्‍यांना चांगला दर बाजारात आल्यानंतर चांगला दरही मिळणार आहे व तोपर्यंत कर्जही उपलब्ध होणार असल्याने शेतकर्‍यांची सोय होणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.