Sat, Jul 20, 2019 23:54होमपेज › Solapur › चला वारीला फेसबुक पेज लोकप्रिय

चला वारीला फेसबुक पेज लोकप्रिय

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 8:25PMवेळापूर : धनंजय पवार

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा पूर्णपणे हायटेक झाला असून महाराष्ट्रासह संपूर्ण जगाला या पालखी  सोहळ्याचे दर्शन घरबसल्या होत आहे. यासाठी फेसबुक, व्हॉटस अप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करून चला वारीला हे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यातील मुख्य कार्यक्रमांसह पालखी सोहळ्याचे क्षणाक्षणांचे अपडेट्स लाखो भाविकांच्या स्मार्टफोन वरती देण्याचा या टीमचा प्रयत्न यशस्वी होताना दिसून येत आहे. 

पुणे अविनाश सूर्यवंशी व त्यांच्या अन्य सहकारी मित्रांनी वारीचे अपडेट्स देण्यासाठी फेसबुक वरती चला वारीला हे पेज बनवले होते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून एक असे नामवंत फोटोग्राफर्स, सोशल मीडिया एक्सपर्ट्स, ग्राफिक डिझायनर्स, ऍनिमेटर, व्हिडीओ एडिटर आदींनी आटोनात कष्ट घेऊन आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे फेसबुक वरती अपडेट्स दिले होते. गतवर्षीच्या या उपक्रमास नेटकरांनीही चांगला प्रतिसाद देऊ केला होता. 

यंदाच्या वर्षीही वारीमध्ये अविनाश सूर्यवंशी, तेजश्री डुंबरे सह मंदार जाधव, आशिष भांगे,अभिजीत मोहीते, अवधुत दासरवाड, अमृता करे, निखिल सोनवणे, दीपेश वैती, अभिजीत जोतकर हे संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे अपडेट्स फेसबुक वरती चला वारीला या पेज वर देत आहेत. यामध्ये माऊलींची नित्याची पहाटपूजा, माऊलींच्या सोहळ्याचे रोजचे वेळापत्रक, सकाळचा विसावा, दुपारचा नैवैद्य, समाज आरती, मुक्‍काम स्थळी होणारी पूजा याचसोबत उभे रिंगण, गोल रिंगण, धावा, मानाचे भारूड यांचे फेसबुक वरती अगदी काही अवधीतच भाविकांना घरबसल्या फोटो, व्हिडीओ, तसेच थेट प्रक्षेपण करून माऊलींच्या सोहळ्याचे ताजे अपडेट ही टीम देत आहे.