Sat, Mar 23, 2019 00:28होमपेज › Solapur › महाविद्यालये विद्यार्थी संघटनांच्या दहशतीखाली

महाविद्यालये विद्यार्थी संघटनांच्या दहशतीखाली

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 22 2018 9:09PMसोलापूर : प्रशांत माने

कमी गुण मिळाल्यानंतरही अमूकच एका महाविद्यालयात प्रवेशाचा हट्ट धरणार्‍या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टमध्ये नाव नसतानाही प्रवेश देण्याचा आग्रह धरणार्‍या तथाकथित विद्यार्थी संघटनांची सध्या ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालयांवर मोठी दहशत असल्याचे चित्र आहे. अनेक महाविद्यालयांतील प्राचार्य आणि प्राध्यापकांमध्ये सध्या विद्यार्थी संघटनांच्या वागणुकीची घबराट असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

दहावी, बारावी परीक्षांच्या निकालानंतर सर्वच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सध्या प्रवेशाची गर्दी आहे. सायन्स आणि कॉमर्स विभागाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी आहे. शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, असे सर्वच विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. परंतु परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसारच महाविद्यालयांच्या प्रवेशाची मेरिट लिस्ट लागते आणि संबंधित विद्यार्थ्यांना यादीनुसार प्रवेश दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले असतात त्यांना इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळतो. पण ज्यांना कमी गुण मिळालेले असतात असे विद्यार्थी इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही की विद्यार्थी संघटनांकडे जातात. शहर व जिल्ह्यात अनेक विद्यार्थी संघटना कार्यरत आहेत.

या विद्यार्थी संघटनांनी संघटनेचे कार्य करताना विद्यार्थी हितासाठी काम करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांवर जर का अन्याय झाला तर विद्यार्थी संघटनांनी लोकशाही मार्गाने न्यायासाठी लढणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले असतील अशा विद्यार्थ्यांना अमूक एका महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी संघटनांनी महाविद्यालयांवर दबाब आणणे म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करुन गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारेच आहे.

कमी गुण असणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आक्रमक होणार्‍या संघटनांची सध्या महाविद्यालयांवर दहशत आहे. एका महाविद्यालयाने तर संघटनांच्या त्रासाला कंटाळून व्यवस्थापन कोटाच सरेंडर केला आहे. महाविद्यालय आणि संघटना हा वाद गतवर्षी विकोपाला जाऊन पोलिसांपर्यंतदेखील पोहोचला होता. एका महाविद्यालयातील प्रवेशाची जबाबदारी असणार्‍या प्राध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही सध्या जीव मुठीत घेऊन काम करीत आहोत.  ही बाब विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांसाठी लाजिरवाणी आहे. चांगल्या विद्यार्थी संघटना याला अपवाददेखील आहेत. दबाव आणणार्‍या संघटनांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.

सोलापूर विद्यापीठाचा मोठा दोष

सर्व जग आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत असताना एका जिल्ह्यासाठी असलेल्या एकुलत्या एक सोलापूर विद्यापीठाचा मात्र उरफाटा कारभार आहे. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणे गरजेचे असताना यंदा ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असल्यास पारदर्शकता वाढते आणि विद्यार्थी संघटनाच काय पण कोणालाही शिफारशीने प्रवेश मिळणार नाही. सोलापूर विद्यापीठाने याची गांभीर्याने  दखल घेण्याची गरज आहे.