Sat, Jun 06, 2020 07:50होमपेज › Solapur › वरिष्ठ व कनिष्ठ अधिकार्‍यांत रंगले शीतयुद्ध

 पोलिस आयुक्तालयात अधिकार्‍यांत रंगले शीतयुद्ध

Published On: May 21 2018 11:14PM | Last Updated: May 21 2018 10:43PMसोलापूर : अमोल व्यवहारे

पोलिस आयुक्‍तालयाचे नाक समजल्या  जाणार्‍या शहर गुन्हे शाखेमध्ये सध्या पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये चांगलेच शीतयुद्ध रंगले आहे. पोलिस उपायुक्‍तांचा     वरदहस्त   लाभल्यामुळेच सहायक पोलिस निरीक्षकाने पोलिस निरीक्षकांच्या कोणत्याही आदेशाला न जुमानता मनमानी कारभार सुरू केल्याची चर्चा आयुक्‍तालयात होऊ लागली असून याकडे पोलिस आयुक्‍तांचे मात्र दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.

सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयामध्ये  शहर  गुन्हे  शाखा ही  आयुक्‍तालयाचे  नाक  समजले जाते. या शाखेकडे एक पोलिस उपायुक्‍त, एक सहायक पोलिस आयुक्‍त, एक पोलिस  निरीक्षक, तीन  सहायक पोलिस  निरीक्षक आणि सुमारे 100 कर्मचार्‍यांची  नियुक्‍ती आहे. शहरामध्ये गुन्हेगारांच्या  कारवाया रोखणे  आणि गुन्हे उघडकीस आणण्याचे महत्त्वाचे काम या शाखेकडून केले जात असल्यामुळे ही शाखा गेल्या कोणत्या ना  कोणत्या  कारणामुळे चर्चेत असतेच. 

आता  सध्यादेखील ही शाखा आणि यातील अधिकारी चर्चेत येण्यासाठीही असेच कारण आहे. या शाखेत पोलिस उपायुक्‍त, सहायक पोलिस आयुक्‍त, पोलिस निरीक्षक, सहायक  पोलिस  निरीक्षक, उपनिरीक्षक अशी अधिकार्‍यांची साखळी असून गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक आहेत. उपायुक्‍त व सहायक पोलिस आयुक्‍त यांच्याकडे इतर शाखांचीही भरपूर कामे असल्याने गुन्हे शाखेकडून काम करून घेण्याची जबाबदारी ही पूर्णपणे पोलिस निरीक्षकांवरच येते. त्यामुळे पोलिस निरीक्षकांच्या हाताखालीच इतर अधिकार्‍यांना काम करावे लागते.

परंतु सध्या आयुक्‍तालयामध्ये वेगळेच चित्र दिसू लागलेले आहे. गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेले काही अधिकारी हे पोलिस निरीक्षकांचे कोणतेही    आदेश   मानत   नसल्याचे  दिसून येत आहे. पोलिस निरीक्षकांनी दिलेली    एखादी   जबाबदारी  पार न पाडणे,  रात्र गस्त    न  करणे, गुन्हे  उघडकीस आणण्याबाबत बोलाविलेल्या बैठकांना उपस्थित न राहणे   असे  प्रकार काही अधिकार्‍यांकडून गेल्या काही दिवसांमध्ये करण्याचे प्रकार वाढले असून या अधिकार्‍यांकडून उघडपणे पोलिस  निरीक्षकांकडे न जाण्याची भाषा बोलली जात आहे. त्यामुळे ‘त्या’ अधिकार्‍याच्या पथकात काम  करणार्‍या  कर्मचार्‍यांची चांगलीच गोची होऊ लागली आहे. आयुक्‍तालयातील उपायुक्‍तांनी जवळ केल्यामुळे अधिकारी अशाप्रकारे वागत असल्याची उघडपणे चर्चा आयुक्‍तालयात होऊ लागली आहे. त्यामुळे  गुन्हे  शाखेत  उघडपणे गटबाजी होत असल्याचे चित्र दिसून येत असून याकडे  पोलिस आयुक्‍तांनी   वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.