होमपेज › Solapur › आंधळगाव पाणीपुरवठा योजना बंद

आंधळगाव पाणीपुरवठा योजना बंद

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 10:17PMलक्ष्मी दहिवडी : प्रमोद बनसोडे

मंगळवेढा तालुक्यातील 10 गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारी आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रशासनाच्या नियोजनाअभावी बंद पडली असून कोणत्याही लोकप्रतिनिधीचे योजनेकडे लक्ष नाही. विशेष म्हणजे ही योजना असल्यामुळे संबंधित गावांना  पिण्याच्या पाण्यासाठी इतर योजनेचा लाभ घेता येत नाही. या योजनेतील 10 गावांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद (शे), अकोला, कचरेवाडी, शरदनगर, देगाव, मारापूर, घरनिकी, धर्मगाव या गावांतील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, म्हणून  तत्कालीन आमदार लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कार्यकाळात ही योजना मंजूर झाली होती. त्यांच्यानंतर डॉ. राम साळे यांच्या कालावधीत या योजनेचे काम पूर्ण झाले होते. यानंतर ही योजना जिल्हा परिषदेला चालविण्यास  देणे आवश्यक असताना जीवन प्राधिकरणालाच ही योजना नियमित चालवता आली नसल्याने शिखर समितीने ही योजना चालवण्यास नकार दिल्यामुळे ही योजना बंद आहे. 2014-15 च्या दुष्काळी वर्षी  तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी टंचाई निधीतून या योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी दिला होता. मात्र प्रशासनाला ही योजना व्यवस्थित चालविता न आल्यामुळे त्यानंतर पुन्हा दुरुस्तीअभावी बंद पडली आहे.

राज्य शासनाचे कोट्यवधी रुपये खर्चून जनतेच्या सेवेसाठी राबविलेली ही योजना नियोजनाअभावी दुरुस्तीअभावी बंद आहे. ही योजना शासनाने राबविली खरी मात्र  प्रशासनाने जागरूकता न ठेवल्यामुळे ही योजना अल्पावधीतच बंद पडली.

ही योजना चालू करण्यासाठी प्रशासन निरुत्साही आहे आणि लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याने योजनेखालील गावांना पाण्यासाठी उन्हाळ्यात पायपीट 
करावी लागत आहे. ही योजना तत्काळ सुरु करण्याची मागणी 10 गावांतील जनतेतून होत आहे.