Wed, Apr 24, 2019 15:29होमपेज › Solapur › विठ्ठल मंदिर समितीचा स्वच्छतेसाठी पुढाकार

विठ्ठल मंदिर समितीचा स्वच्छतेसाठी पुढाकार

Published On: Mar 24 2018 1:55AM | Last Updated: Mar 23 2018 10:28PMपंढरपूर : प्रतिनिधी

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मंदिर परिसरासह चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले असून लवकरच खासगी कंपनीला स्वच्छतेचे काम ठेकेदारी पद्धतीने दिले जाणार आहे. त्यामुळे यापुढे पंढरपूरला अस्वच्छ शहर म्हणून दिली जाणारी दुषणे कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

श्री. विठ्ठल दर्शनाकरिता पंढरपूर शहरात दररोज किमान 35 ते 40 हजार भाविक येत असतात. या भाविकांमुळे मंदिर परिसर आणि चंद्रभागेच्या वाळवंटात तसेच प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा पडतो. विशेषत: मंदिर परिसर आणि वाळवंटात या कचर्‍याचे प्रमाण प्रचंड स्वरूपात असते. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांकडून पंढरीच्या अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्‍त केली जाते. विठ्ठल मंदिर समितीने आजवर आपल्या मालकीच्या परिसराबाहेर स्वच्छतेसाठी कधी पाऊल उचलले नव्हते. आणि मंदिर समिती उत्पन्न मिळवते म्हणून त्या परिसरात स्वच्छता करण्यासाठी नगरपालिका फारशी राजी नव्हती. या वादातूनच चार वर्षांपुर्वी मंदिर समितीकडे पंढरपूर नगरपालिकेने वार्षीक उत्पन्नाच्या 50 टक्के रक्‍कम स्वच्छता, पाणी, दिवा बत्तीसाठी द्यावी अशीही मागणी केली होती. त्यानंतर काही प्रमाणात मंदिर समितीने स्वच्छतेसाठी हातभार लावताना शहरातील मठ, मंदिरे आणि खासगी नागरिकांनाही शौचालय बांधण्यास अनुदाने दिली. मात्र एवढ्यानेही स्वच्छतेचा प्रश्‍न सुटला नव्हता. 

मात्र आता मंदिर समितीच्यावतीने शहरातील स्वच्छतेसाठी खासगी कंपनीला वार्षिक ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत निर्णय झाला असून येत्या 7 एप्रिलपासून  या खासगी कंपनीचे कर्मचारी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांगेत दररोज नियमीत झाडलोट करणार आहेत आणि पडलेला कचराही उचलणार आहेत. त्याचबरोबर मंदिर समिती तसेच पंढरपूर नगरपालिकेनेही मंदिर परिसरातील व्यापार्‍यांना स्वच्छतेसंदर्भात आवाहन केलेले आहे. तसेच सामाजिक संघटना, विविध व्यवसायिकांनाही मंदिर समितीच्या वतीने स्वच्छतेच्या कामी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

मंदिर समिती परिसरातील व्यापार्‍यांना लवकच कचरा कुंड्या देणार असून त्यांच्याकडील कचरा या कुंड्यातून टाकण्याचेही आवाहन व्यापार्‍यांना केलेले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून सांगली येथील वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने मंदिर परिसरात स्वच्छतेचे काम केले जात आहे. त्यामुळे मंदिर परिसरात स्वच्छता दिसून येत आहे. मात्र 8 एप्रिलपासून खासगी कंपनी मार्फत नियमीत स्वच्छतेचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे अस्वच्छ पंढरी ही ओळख पुसली जाणार असून स्वच्छ पंढरी, सुंदर पंढरी हे ब्रीद प्रत्यक्षात उतरण्याची अपेक्षा बळावली आहे. 

मंदिर समितीच्यावतीने शहरातील स्वच्छतेसाठी खासगी कंपनीला वार्षीक ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत निर्णय झाला असून येत्या 7 एप्रीलपासून  या खासगी कंपनीचे कर्मचारी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांगेत दररोज नियमीत झाडलोट करणार आहेत आणि पडलेला कचराही उचलणार आहेत.


- सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती