Sun, Aug 18, 2019 21:14होमपेज › Solapur › स्वामी समर्थांचे सातवे वंशज असल्याचा न्यायालयात दावा

स्वामी समर्थांचे सातवे वंशज असल्याचा न्यायालयात दावा

Published On: Sep 13 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 11:29PMसोलापूर : विशेष प्रतिनिधी 

अक्‍कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे विवाहित होते. त्यांचे खरे नाव चंचल भारती होते. आपण त्यांचे थेट सातवे वंशज आहोत, असा दावा पुणे जिल्ह्यातील वडापुरी येथील वैभव रतन गोसावी (भारती) यांनी सोलापूर येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करून केला आहे. शासनासह काही प्रकाशन संस्थांना त्यांनी प्रतिवादी केले असून, स्वामी समर्थ तथा चंचल भारती यांचे थेट वंशज असल्याचा जाहीर ठराव (डिक्‍लेरेशन) करून मिळावा, अशी मागणीही त्यांनी या दाव्यात केली आहे. त्यासंदर्भात मोडी लिपीतील काही दस्तावेजदेखील सादर केले आहेत.

अ‍ॅड. हेमंत होळकर यांच्यामार्फत मंगळवारी दाखल झालेल्या या दाव्याची माहिती अ‍ॅड. होळकर यांनीच दैनिक ‘पुढारी’ला दिली. त्यानुसार,  वैभव गोसावी यांनी राज्याचे मुख्य सचिव, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर ट्रस्ट अक्‍कलकोट, धार्मिक प्रकाशन संस्था गिरगाव मुंबई, पुण्याचे अनमोल प्रकाशन यांना प्रतिवादी केले आहे. या प्रतिवादी प्रकाशन संस्थांनी अनुक्रमे स्वामी समर्थ महाराजांचे आद्य बखर तसेच श्री स्वामी समर्थ हे ग्रंथ प्रकाशित केले असून, या ग्रंथात स्वामी समर्थ हे जन्मशून्य होते. ते कर्दळी वनातून प्रकट झाले होते. ते संन्यासी व ब्रह्मचारी होते. ब्राह्मण जातीचे असावेत वगैरे खोटा मजकूर लिहिला असल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. या मजकुरामुळे स्वामी समर्थांच्या आई-वडील त्यांचे कुटुंब आणि वंशजांचा अवमान झाल्याचा दावा करत हा मजकूर आमच्या पूर्वजांच्या व आमच्या चारित्र्याशी व सामाजिक स्थानाशी निगडीत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 

स्वामी समर्थांचे नाव चंचल भारती असे असून तसा स्वामींच्या ग्रंथामध्येदेखील उल्लेख आहे. ते मूळ वडापुरी (ता. इंदापुर, जि. पुणे) येथील रहिवासी होते. त्यांच्या मुलाचे नाव भगवान असे होते. स्वामींच्या एका नातेवाईकाने त्यांच्या मुलाला पाठविलेल्या लग्नपत्रिकेवरदेखील भगवान चंचल भारती असा उल्लेख आहे. ही पत्रिका त्यांच्याकडे उपलब्ध आहे. 1917 साली भगवान भारती यांचा तापसरी आजाराने मृत्यू झाल्याचा दावा त्यांचे वंशज गोसावी यांनी केला. त्यामुळे वैभव रतन गोसावी (भारती) यांनी ते स्वामी समर्थ महाराज यांचे थेट वंशज असल्याचा जाहीर ठराव करण्याची मागणी न्यायालयास केली असून प्रतिवादी यांनी वादीच्या परवानगीशिवाय स्वामी समर्थ यांच्या नावाची मूर्ती, समाधीस्थळाचा वापर करू नये, असा मनाई हुकूमही त्यांनी मागितला आहे. या दाव्यासाठी वैभव रतन गोसावी यांनी मोडी लिपीतील अनेक पत्रे, वंशावळ, जमिनीची कागदपत्रे व पत्रव्यवहार इत्यादी अनेक पुरावे जोडले असून अ‍ॅड. हेमंत होळकर हे गोसावी यांची बाजू दिवाणी न्यायालयात मांडत आहेत.