Mon, Jun 17, 2019 04:58होमपेज › Solapur › सिव्हिल हॉस्पिटलमधील रोजंदारी कर्मचार्‍यांचे बेमुदत धरणे आंदोलन

सिव्हिल हॉस्पिटलमधील रोजंदारी कर्मचार्‍यांचे बेमुदत धरणे आंदोलन

Published On: Mar 07 2018 9:35AM | Last Updated: Mar 06 2018 9:09PMसोलापूर ;  प्रतिनिधी

गेल्या चार वर्षांपासून रोजंदारी कर्मचार्‍यांच्या वेतनाची समस्या कायम आहे. त्यामुळे या त्रासाला कंटाळून अखेर सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्वच 120 रोजंदारी कर्मचार्‍यांनी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा सिव्हिल प्रशासनाला दिला आहे. यामुळे येथील आरोग्यसेवा कोलमडू शकते. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय आणि डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडून परिसराची साफसफाई, येथील सर्व विभागांच्या स्वच्छता ते आयसीयूपर्यंत सर्व कामे वेळेवर करून घेतली जातात. परंतु त्यांचे वेतन मात्र वेळेवर दिले जात नाही. हा प्रश्‍न गेल्या चार वर्षांपासून कायम आहे.

याला कंटाळून येथील रोजंदारी कर्मचार्‍यांनी मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांना वेळोवळी निवेदन दिले आहे. तरीही हा प्रश्‍न ‘जैसे थे’ आहे. त्यानंतर या कर्मचार्‍यांनी राज्य आरोग्यमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी आदींना वेळोवेळी निवेदने दिली आहेत. तरीही वेतनाचा प्रश्‍न सुटला नाही. सध्या गेल्या चार महिन्यांपासून वेतन अदा केले गेले नाही. त्यामुळे या वारंवारच्या प्रकाराला कंटाळून येथील रोजंदारी कर्मचार्‍यांनी अखेर 12 मार्चपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा सिव्हिल प्रशासनाला दिला आहे. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे गेटच्या बाहेरील बाजूस हे बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. 

याबाबत अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे हे वारंवार प्रयत्न करत आहेत. मात्र चार महिने होत आले तरीही वेतन अदा होत नाही तसेच ट्रेझरीकडून अडवणूक होत आहे. रोजंदारी कर्मचार्‍यांनी आंदोलन केल्यास त्यांचे नुकसान होईल, असे त्यांनी सांगितले.