Thu, Apr 25, 2019 23:52होमपेज › Solapur › भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात माणकेश्‍वरमध्ये बालक गंभीर

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात माणकेश्‍वरमध्ये बालक गंभीर

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 10:27PMसोलापूर : प्रतिनिधी

बार्शी तालुक्यातील माणकेश्‍वर गावात भटक्या कुत्र्याने चिमुकल्याचा कान अक्षरशः लचके देऊन तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताहेर बादेला असे या चिमुकल्याचे नाव असून तो दीड वर्षाचा आहे. हे बालक अंगणात खेळत असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले; परंतु डॉक्टरांनी त्याला तातडीने सोलापूरला हलविण्याचा सल्ला दिला. तुटलेला कान कॅरिबॅगमध्ये घेऊन त्याचे कुटुंबीय सोलापूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आले होते. 

या बालकावर वैद्यकीय उपचार सुरू असून प्लास्टिक सर्जरीद्वारे कान पुन्हा जोडता येतो का, याबाबत डॉक्टर चाचपणी करत होते. या घटनेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

बार्शी तालुक्यातील माणकेश्‍वर गावासह परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून अशाच एका भटक्या कुत्र्याने अंगणात खेळणार्‍या 
ताहेर बादेला या बालकावर हल्ला चढविला. या कुत्र्याने त्याचा कान अक्षरशः लचके देऊन तोडला. त्याची आरडाओरड ऐकून ग्रामस्थ व कुटुंबीय धावून आले. बाळाच्या आईने कुत्र्याला हाकलून लावेपर्यंत कान कुरतडून तोडला गेला होता. या बालकाला तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी सोलापूरला हलविण्याचा सल्ला दिला. प्राथमिक उपचारानंतर या बाळाला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कुत्र्याने तोडलेला कान प्लॅस्टिक कॅरिबॅगमध्ये सोबत आणण्यात आला होता. ते दृश्य पाहून डॉक्टरांसह अनेकांचा थरकाप उडाला. डॉक्टरांनी प्लॅस्टिक सर्जरीद्वारे हा कान पुन्हा जोडता येईल का, याची चाचपणी सुरू केली होती. या बाळाला पुढील सहा दिवस शासकीय रुग्णालयात ठेवण्यात येणार असून जखमा अतिशय खोल असल्या तरी त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सोलापूर येथील तज्ज्ञ डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत.

या प्रकारासंदर्भात नगरपरिषदेला कळविण्यात आले असून त्यामुळे लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. या हल्ल्यात ताहेर हा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण  पसरले आहे. शहर व ग्रामीण परिसरात भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या, चावा घेतल्याने होणारा रेबीज हा आजार, शासकीय रुग्णालयात असणारी रेबीज प्रतिबंधक लसीची टंचाई आणि रस्त्यावर कुत्रे आडवे होऊन होणारे अपघात यावर उपाययोजना होत नसल्याने भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनलेली आहे.