Sun, Nov 18, 2018 09:25होमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा, हेलिपॅडला कडेकोट पोलिस बंदोबस्त(व्हिडिओ) 

मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा, हेलिपॅडला कडेकोट पोलिस बंदोबस्त(व्हिडिओ) 

Published On: Jul 22 2018 12:55PM | Last Updated: Jul 22 2018 12:46PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येत आहेत. सोलापूरहुन मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने सायंकाळी ६ च्या दरम्यान पंढरपुरात दाखल होतील. त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त मागवला असून, शहरात सर्वत्र पोलिसच दिसत आहेत.

मुख्यमंत्री ज्या हेलिपॅडवर उतरणार आहेत त्या हेलिपॅडच्या सभोवती तीनशे मीटवर लाकडी कंपाउंड घातले असून, चारही बाजूला पोलिस खडा पहारा देणार आहेत. हेलिपॅड परिसरात सद्यस्थितीत कुणालाही जाऊ दिले जात नाही. मुख्यमंत्री ज्या मार्गाने शहरात नियोजित कार्यक्रमास जाणार आहेत त्या मार्गावर गणवेशासह नागरी वेशातही पोलिस तैनात केले आहेत. मोटार सायकलवरून मार्गावर पाळत ठेवणारी पोलिसांची पथके घिरट्या घालत आहेत. कधी नव्हे ते आठ हजाराहून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी पाचारण केले गेले आहेत.  मंदिर परिसर आणि ज्या मार्गावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार आहे त्या मार्गावरील राहत्या लोकांना 149 च्या नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. नियोजित कार्यक्रम स्थळी दोन दिवसांपासून पोलिस तैनात केले आहेत. मुंबईहून विशेष प्रशिक्षित पोलिस पथके बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आलेली आहेत. भाविकांची वाढती गर्दी आणि चिघळत असलेले आंदोलन लक्षात घेता संपूर्ण सुरक्षा व्यवस्था सतर्क ठेवण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील पंढरपुरात दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. आंदोलकांवर कारवाई करण्याबरोबरच सर्व समाज घटकातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे.