Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी : मराठा मोर्चा

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी : मराठा मोर्चा

Published On: Jul 23 2018 5:12PM | Last Updated: Jul 23 2018 5:24PMमोहोळ : वार्ताहर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजा बद्दल महाराष्ट्रात गैरसमज पसरेल असे वक्तव्य केले आहे. मराठा समाजाचा लढा सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात असून अन्य जाती धर्मांशी नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांचा एकही खुला कार्यक्रम होवू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे सोलापूर जिल्हा समन्वयक माऊली पवार यांनी दिला.

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे. यांसह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा मोहोळ शहर व तालुका यांच्या वतीने २३ जुलै रोजी मोहोळच्या तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आजवर मराठा समाजाने शांततेत मुक मोर्चे काढून सरकार दरबारी मागण्या मांडल्या होत्या. मात्र सरकारने दिलेला शब्द तर पाळलाच नाही उलट मराठा समाजा विषयी वारकऱ्यांचा गैरसमज निर्माण होईल असे बदनामीकारक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षीत नव्हते. 

मराठा समाज कुणालाही वेठीस धरणारा समाज नसून दुबळ्यांच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणारा समाज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मराठा समाजाची जाहीर माफी मागावी. मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापुजेला आले नसले तरी मराठा समाजाचे आंदोलन थांबलेले नाही. यापुढील काळात मराठा समाज लोकशाही मार्गाने आंदोलने सुरु ठेवून सरकारला सळो की पळो करणार आहे.

यावेळी मोहोळ तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी सर्वपक्षीय मराठा समाजाचे पदाधिकारी एकत्र आले होते. मोहोळ तालुक्यात रविवारी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या ठिय्या आंदोलना दरम्यान मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि सपोनि विक्रांत बोधे यांनी आंदोलन स्थळासह शहरातील विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनामध्ये मोहोळ शहर व तालुक्यातील शेकडो मराठा बांधवांसह मागासवर्गीय समाज बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी सहभाग घेतला होता.