Tue, Apr 23, 2019 19:33होमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांनी ‘व्ही.सी.’वर घेतला योजनांचा आढावा

मुख्यमंत्र्यांनी ‘व्ही.सी.’वर घेतला योजनांचा आढावा

Published On: Aug 04 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 10:51PMसोलापूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स संवाद साधून विविध योजनांचा आढावा घेतला. प्रामुख्याने मराठा समाजाच्या मागणीनुसार वसतिगृहासाठी इमारत, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेचा यात समावेश होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शुक्रवारी सायंकाळी तातडीने जिल्हाधिकारी सर्व अधिकार्‍यांच्या लवाजम्यासह वसतिगृह इमारतीच्या शोधासाठी निघाले.

मराठा आंदोलन पेटले असल्याने मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाचा धसका घेत जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा प्रशासनाला मराठा समाजाच्या मागण्यांसाठी कामाला लावले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी व्हिसीद्वारे जिल्ह्यातील पीकपाणी, पंतप्रधान आवास योजना, राजर्षी शाहू शिष्यवृत्ती, अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मराठा मुलाांसठी वसतिगृह आदींबाबत आढावा घेतला आहे.

जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत 203 मि.मी. पाऊस अपेक्षित होता,; परंतु फक्त 103 मि.मी. पाऊस म्हणजे 15 टक्के इतका पडलेला आहे. प्रामुख्याने अक्कलकोट, दक्षिण, बार्शी या तालुक्यांत 70 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली असून उडीद, सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. सोलापूर खरिपाचा जिल्हा नसला तरी सुमारे एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाची जिल्ह्यात पेरणी झाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील 12 नगरपालिका क्षेत्रात काम सुरु आहे. सन 2022 पर्यंत जिल्ह्याला 16 हजार 551 इतके उद्दिष्ट्य आहे. सन 2017-18 साठी 1695 आणि सन 2018-19 साठी 3309 इतके उद्दिष्ट्य होते. यापैकी 781 इतके उद्दिष्ट्य पूर्ण झाले आहे.

छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतून 5179 विद्यार्थ्यांची यादी आहे. यासाठी स्वतंत्र सेल केले असून महाविद्यालयाकडून 50 टक्के रक्कम परत केली जात आहे. अहवाल आल्यानंतर रक्कम परत न करणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाकडे एकूण 1554 अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून बँकेकडे गेलेल्या 11 प्रस्तावांपैकी 7 मंजूर झाले, तर मुदतीपूर्वीचे असल्याने 4 अपात्र झाले. मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी मराठा मंडळ व शासकीय दूध डेअरी  येथील इमारतींची पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांच्या अधिकार्‍यांसह वसतिगृहासाठी इमारतीची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.

ऊस बिलासाठी साखर आयुक्त अ‍ॅथॉरिटी
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे यंदा ऊस बिलापोटी जवळपास सव्वातीनशे कोटींच्यावर थकबाकी आहे. साखर कारखान्यांकडून बिल मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहेत. आर्थिक संकटातील एका शेतकर्‍याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कारखान्यांकडील थकीत बिलासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, साखर आयुक्तांनी या प्रकरणात कारवाई करणे अपेक्षित आहे. तरीदेखील आपण संबंधितांशी बैठक घेतली असून बिले लवकर देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.