Mon, Apr 22, 2019 04:01होमपेज › Solapur › सांगोल्यात शिवजयंती मिरवणुकीत दगडफेक

सांगोल्यात शिवजयंती मिरवणुकीत दगडफेक

Published On: Feb 19 2018 10:54PM | Last Updated: Feb 19 2018 10:40PM
सांगोला : तालुका प्रतिनिधी

सांगोल्यात शिवजयंती मिरवणुकीत काही समाजकंटकांनी अचानक भीमनगरसमोर येऊन गोंधळ करत वाहनांवर दगडफेक करून नुकसान केले. हा प्रकार दु. 12.30 ते 1 वा.च्या दरम्यान  घडला. पोलिस व मिरवणुकीतील शिवप्रेमींनी प्रसंगावधान राखून समाजकंटकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांना दाद दिली नाही. दगडफेकीच्या घटनेमुळे भीमनगरसह शहरात वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वातावरण शांत केले. 

या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. वीरेश प्रभू, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, यांनी सांगोला पोलिस स्टेशनला येऊन घडलेल्या घटनेची माहिती घेऊन पोलिसांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. सध्या भीमनगर, कडलास नाका, वासूद चौक, वाढेगाव चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या सांगोल्यासह भीमनगर परिसरात तणावपूर्ण शांतता असली, तरी शहरात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. 

शिवजयंतीनिमित्त मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड यांच्यासह शिवप्रेमी नागरिकांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य मिरवणूक काढली. मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व तहसील कार्यालयासमोरून कचेरी रोडने गावात जात असताना मिरवणुकीतील काही समाजकंटकांनी अचानक भीमनगर येथे आले. यावेळी, या समाजकंटकांनी भीमनगरसमोर गोंधळ घालीत वाहनांवर दगडफेक सुरू केली. अचानक हा प्रकार सुरू झाल्याने  बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी समाजकंटकांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पोलिसांचे काही एक न ऐकता आर्टिका कार, स्कॉर्पिओ, स्विफ्ट, इनोव्हा, दोन पोलिस गाड्यांवर दगडफेक करून नुकसान केले. हा सारा प्रकार सुरू असताना दलित बांधवांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य केले आहे.सामाजिक सलोखा राखन्याचे शांतता

कमिटीच्या बैठकीत आवाहन

छ.शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले अशा युगपुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागचा उद्देश एकच असून तो म्हणजे समाज-समाजात सामाजिक सलोखा रहावा हा आहे. परंतु, अलीकडच्या काळात उत्सवांना आकारण वेगळे वळण लागून समाजात शांतता नको असलेल्या समाजकंटकांकडून असे प्रकार सुरू आहेत. अशा घटना निंदनीय व निषेधार्थ आहेत. पोलिसांनी जे कोणी समाजकंटक आहेत त्यांना सी.सी.टी.व्ही.च्या आधारे अगर प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. यामध्ये निरपराध नागरिकांना त्रास होऊ नये याची दक्षत घ्यावी. भीमनगर येथील दलित बांधवांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे. असे आवाहन आ.डॉ.गणपतराव देशमुख यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले आहे.

यावेळी, मा.आ.दीपकआबा साळुंखे-पाटील, मा.आ.अ‍ॅड.शहाजीबापू पाटील, बाबुराव गायकवाड, बाळासाहेब मस्के, अरविंद केदार, सूरज बनसोडे, कुंदन बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, अप्सरा ठोकळे, आदिंनी घडलेली घटना निंदनीय असून समाजकंटकांना कोणीही अभय न देता पोलिसांनी त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी एकमुखी मागणी केली आहे. पो.नि.राजकुमार केंद्रे यांनी सूचनांची दखल घेऊन घडलेल्या प्रकारात जे कोणी असतील  त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. ज्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. अशांनी वैयक्तिक तक्रारी द्याव्यात अशा सूचनाही बैठकीत केल्या.