होमपेज › Solapur › कृत्रिम पावसासाठी चाचपणी सुरू

कृत्रिम पावसासाठी चाचपणी सुरू

Published On: Aug 15 2018 1:27AM | Last Updated: Aug 14 2018 10:53PMसोलापूर ः प्रतिनिधी

सध्या सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. या पार्श्‍वभूमीवर भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था तथा पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार या संस्थेच्या तज्ज्ञ मंडळींची नुकतीच बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेले काम कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी नाही, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी चाचणी असल्याचा खुलासा संस्थेच्या प्रकल्प अधिकारी थारा प्रभाकरन यांनी केला.

मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात असणार्‍या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे. यामध्ये सिंहगड कॉलेज येथे यंत्रणा बसविण्यात आली असून दररोज सोलापूर जिल्ह्यातील वातावरणात होणार्‍या बदलाचा अभ्यास या ठिकाणी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच आजपर्यंत 365 बलून आकाशात सोडण्यात आले आहेत. त्या माध्यमातून अनेक माहिती संस्थेच्या हाती आली आहे. ही संस्था सध्या जिल्ह्यातील हवामानाचा अभ्यास करणार आहे, तसेच या ठिकाणी पाऊस पाडणे शक्य आहे की नाही, त्यासाठी कोणत्या गोष्टी करणे अपेक्षित आहेत, या ठिकाणी निर्माण होणारे ढग कृत्रिम पावसासाठी योग्य आहेत की नाहीत, तसेच पाऊस पाडला तर तो किती पडेल, त्याचा फायदा कितपत होईल या सर्व गोष्टींचा अहवाल तयार करून तो शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर हा अभ्यास करताना अडचणी येऊ नयेत यासाठी पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही थारा प्रभाकरन यांनी केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, डॉ. पी.डी. साफिया, डॉ. एस. ए. दीक्षित, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.