Mon, May 20, 2019 20:25होमपेज › Solapur › संपादन केलेली कृषी पदवी, पदविका घ्या तपासून

संपादन केलेली कृषी पदवी, पदविका घ्या तपासून

Published On: Jul 09 2018 11:07PM | Last Updated: Jul 09 2018 10:46PM
सोलापूर : रामकृष्ण लांबतुरे 

शहर-जिल्हा नव्हे तर पूर्ण राज्यभरातून मोठ्या परिश्रमाने संपादन केलेली कृषी पदवी, पदविका  आता विद्यार्थांनी तपासून बघण्याची गरज निर्माण झाली आहे, कारणही तसेच आहे. अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथे बोगस मागासवर्गीय खुले कृषी विद्यापीठ काढून  2013 पासून आजतागायत राज्यातील सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव, धुळे, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, उस्मानाबाद, बीड, लातूर, औरंगाबाद व  ठाणे  या  14  जिल्ह्यांत  62 विद्यालय व महाविद्यालये उभारुन अनेक विद्यार्थी-पालकांची आर्थिक फसवणूक केली आहे. यासंदर्भात शिक्षण संचालक डॉ. हरिहर कृष्णराव कौसडीकर यांनी फिर्याद दाखल केल्याने अण्णाप्पा सुरप्पा इसुरे (यामिनीनगर, विजापूर रोड), डॉ. आशिष सर्जेराव ढाके (बोरखेडा, चाळीसगाव, बुलढाणा), विठ्ठल गवळी (चिखली, बुलढाणा), बी. एस. पाटील (सोलापूर) अशा चौघांवर  अक्कलकोट दक्षिण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील मुख्य आरोपी अण्णप्पा सुरप्पा इसुरे याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्यास  पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मुख्य आरोपी अण्णापा इसुरे याने अक्कलकोट तालुक्यातील तडवळ गावात बोगस मागासवर्गीग्य खुले कृषी विद्यापीठ स्थापन केले. वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे, त्यात प्रमाणपत्र, मान्यता पत्र, कृषी पदविका प्रमाणपत्र तयार करुन बनावट कागदपत्रे सर्रास वापरली. बनावट विद्यापीठाची बनावट वेबसाईट तयार केली. 

तपासाअंती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीत  कार्यक्षेत्रात  35 विद्यालये-महाविद्यालये, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याच्या कार्यक्षेत्रात  3, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या कार्यक्षेत्रात 23, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ  दापोलीच्या कार्यक्षेत्रात 1 विद्यालय अशी 62 बोगस विद्यालये, महाविद्यालये काढल्याचे निष्पन्न झाले आहे. 

बोगस विद्यापीठ कार्यान्वित करुन खोट्या जाहिराती  देऊन खोटी माहितीपत्रके तयार करुन विद्यार्थी, पालकांना आकर्षित करुन फसवणूक केली आहे. खोटा अभ्यासक्रम तयार करुन प्रवेश देऊन शासनाची कोणत्याही प्रकारची मान्यता नसताना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक शुल्क घेऊन खोट्या पदव्यांची, पदविकांची प्रमाणपत्रे छापून घेऊन तशी विद्यार्थ्यांना दिली आहेत, असे करुन यांनी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम 1983 चे कलम 9 चे उल्लंघन केले आहे.