होमपेज › Solapur › चंद्रभागेच्या दूषित पाण्यात भाविकांना पुण्यप्राप्ती!

चंद्रभागेच्या दूषित पाण्यात भाविकांना पुण्यप्राप्ती!

Published On: May 29 2018 10:51PM | Last Updated: May 29 2018 10:26PMजया दोषा परिहार, नाही नाही धुंडिता शास्त्र !
तेही हरती अपार, पंढरपूर देखिलिया !!
ऐसा भीमा तीर, चंद्रभागा सरोवर !
पद्मतीर्थी विठ्ठल वीर, क्रीडास्थळ वेणूनाद !!
असे वर्णन संतांनी ज्या चंद्रभागा नदीचे केले आहे त्या चंद्रभागेची सध्याची अवस्था अतिशय विद्रुप असून दुर्गंधीयुक्‍त, प्रदूषित पाण्यातच स्नान करून भाविकांना पुण्यप्राप्ती करून घ्यावी लागते आहे.

पंढरपूर : प्रतिनिधी

सध्या अधिक मासानिमित्त पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.  स्नानासाठी भाविकांनी चंद्रभागा वाळवंट फुलले आहे. मात्र भाविकांना स्वच्छ पाण्याऐवजी डबक्यात साचलेल्या दुर्गंधीयुक्‍त घाण पाण्यात स्नान उरकावे लागत आहे.   16 मेपासून अधिक मासारंभ झाला असून भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. येथील मंदिर समिती व नगरपालिकेच्यावतीने भाविकांसाठी अत्यावश्यक सेवासुविधांची उपलब्धता करण्यात आलेली आहे.  मंदिर परिसर, चंद्रभाग वाळवंट स्वच्छतेचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे. मात्र भाविकांना दुर्गंधीयुक्‍त पाण्यात स्नान करावे लागत असल्याने अधिकतर भाविक स्नानापासून दूर राहात आहेत. अधिक मासात भाविकांची महिनाभर होणार ी गर्दी लक्षात घेऊन विष्णूपद  बंधार्‍यात  पाणी सोडणे गरजेचे होते. मात्र गुरसाळे येथील बंधार्‍यात पाणी नसल्याने पुंडलिक मंदिराजवळ पुरेसे  पाणी उपलब्ध नाही. उजनीतून पाणी सोडून भाविकांच्या स्नानाची  सोय करावी, अशी मागणी वारकर्‍यांकडून केली जात आहे. 

मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने  भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र नदीपात्रात  स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांना अपुर्‍या प्रमाणात दुर्गंधी आणि शेवाळयुक्‍त, काळ्या पाण्यात स्नान करावे लागत आहे.   गेल्या दोन महिन्यांपासून गोपाळपूर येथील बंधार्‍यात पाणी साठवलेले आहे. या पाण्याचा निचरा होणे गरजेचे असले तरी उजनी धरणातून पाणी येईपर्यंत गोपाळपूर बंधार्‍यातील पाणी सोडता येणार नाही. या परिस्थितीत पुंडलिक मंदिराजवळ भाविक स्नान करण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र याठिकाणी  प्रदूषित पाण्याचा उग्र वास येत असल्याने भाविक याठिकाणी थांबणे टाळत आहेत.  पात्रात पाणी कमी असल्याने  पाण्यात टाकलेले निर्माल्य, शिळे अन्न, पेढे, प्रासादिक वस्तू, फाटके कपडे, शेवाळ्याचा थर  यामुळे नदीपात्र विद्रूप झालेले आहे.  उजनी धरणातून तातडीने पाणी सोडून गोपाळपूर बंधार्‍यात या पाण्याचा साठा करण्यात यावा, अशी मागणी  वारकर्‍यांकडून होत आहे. महाराष्ट्राची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंढरीत भाविकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.