Fri, Apr 26, 2019 17:57होमपेज › Solapur › चंद्रभागा वाळवंट वाळू माफियांनी पोखरले

चंद्रभागा वाळवंट वाळू माफियांनी पोखरले

Published On: Jun 17 2018 10:41PM | Last Updated: Jun 17 2018 9:01PMपंढरपूर : प्रतिनिधी

चंद्रभागा वाळवंटाचे वाळू माफिया लचके तोडत आहेत. वाळू उपशामुळे मोठ -मोठे खड्डे पडले असून हेच खड्डे भाविकांच्या जीवावर बेतलेले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन चंद्रभागा वाळवंटातून होणारी अवैध वाळू चोरी थांबवावी अशी मागणी नागरिक, भाविकांतून होत आहे.

उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे विष्णुपद बंधारा भरल्याने चंद्रभागा नदीत पुंडलिक मंदिराजवळ मुबलक पाणी साठा झाला आहे. नुकताच संपलेल्या अधिकमासात या ठिकाणी अनेक भाविकांनी स्नान करण्यासाठी उपस्थिती लावली. अद्यापही भाविक मोठ्या संख्येने चंद्रभागा स्नान करण्यासाठी व श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत आहेत. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांना प्रथम येथे रात्री अपरात्री अवैध वाळू उपसा करून पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी वाळू माफिया चंद्रभागा वाळवंटातून अवैधरित्या वाळू उपसा करत आहेत. गाढवांच्या मदतीने येथील वाळूवर डल्ला मारण्यात येत आहे. गाढवांद्वारे होत असलेल्या वाळू वाहतुकीतून चंद्रभागा घाट, दत्त घाट येथील पायर्‍यांवर वाळू पडलेली दिसून येते. गेल्या वर्षभरापासून पंढरपूर शहर व तालुक्यात वाळू उपशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सद्या वाळू उपसा बंद आहे. त्यामुळे घरबांधकामांसाठी वाळू ऐवजी क्रश सॅन्डचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.  परंतु भीमा नदीपात्रातून होणारी अवैध वाळू चोरी काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. वाळू माफिया रातोरात वाळूचा अवैधरित्या उपास करत आहेत. यातून लाखो रुपये मिळत असल्याने महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाला हाताशी धरून वाळू चोरीचा धंदा वाळू माफियांकडून जोरात सुरू आहे. महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे वाळू माफिया चंद्रभागा वाळवंटातून पुंडलिक मंदिरा शेजारची वाळू उपसून नेत आहेत.  वाळू उपशाने पडलेले खड्डे मात्र कोणतीही तक्रार न करता भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार मनात आणून प्रशासनाकडून  बुजवले जातात. वाळू माफियांनी वाळूचा उपसा करून खड्डे पाडायचे आणि प्रशासनाने बुजवायचे हा त्यांचा दररोजचा सरावाचा भाग झाला आहे. असे असले तरी सद्या नदीपात्रात पाणी भरपूर आहे. या कालावधीत जोरदार पाऊस पडून खड्डे पाण्याने भरले गेले तर हेच खड्डे भाविकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या अगोदर खड्ड्यांमुळे भाविकांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.