Tue, May 21, 2019 12:08होमपेज › Solapur › चैत्री यात्रा; वाखरी येथील बाजारात ३०० जनावरे

चैत्री यात्रा; वाखरी येथील बाजारात ३०० जनावरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी 

    चैत्री यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या वाखरी येथील जनावरांच्या बाजारात जेमतेम 300 जनावरे दाखल झाली आहेत. बैल, गाय, म्हैस  यांच्याबरोबर जर्सी गायीदेखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहे. मात्र खिलार खोंड व वळूला अधिक मागणी होताना दिसत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने जनावरांसाठी पाणी, विजेची उत्तम सोय  करण्यात आली आहे.

    कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीपआप्पा घाडगे, व्हा. चेअरमन विवेक कचरे यांच्या नियोजनाखाली वाखरी (ता. पंढरपूर) येथे चैत्री यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरविण्यात आला आहे. जनावरांच्या बाजारात जनावरांना पिण्याचे पाणी, विजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.  उन्हापासून जनावरांना त्रास होऊ नये म्हणून या बाजार तळावर  लावण्यात आलेल्या वृक्षांची सावली फायदेशीर ठरत आहे. उन्हाळ्याची परिस्थिती असल्याने बहुतेक शेतकर्‍यांनी चार्‍याअभावी जनावरांचे हाल होऊ नयेत म्हणून जनारांना बाजारात विक्रीसाठी दाखल केले आहे. परंतु चालू वर्षी जनावरांच्या चार्‍याची स्थिती चांगली असल्याने चैत्री यात्रेत जनावरे विक्रीसाठी कमी संख्येने दाखल झाले आहेत. बाजारात म्हैस, खिलार गाय, बैल, खिलार खोंड, जर्सी गाय आदी दाखल झाले आहेत. यात जर्सी गाय व खिलार खोंड यांना अधिक मागणी होत आहे.

शेतीच्या कामात बैलांचा वापर कमी होत चालला असल्याने बैलांना म्हणावी तशी मागणी होताना दिसत नाही. उलट दुभती जनावरे म्हैस, जर्सी गाय यांना कर्नाटक, नागपूर, पुणे, सांगली येथून आलेल्या भाविकांकडून, व्यापार्‍यांकडून जास्त मागणी होत आहे. म्हैस 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत मागणी होत आहे, तर जर्सी गाय 30 ते 70 हजार रुपयांपर्यंत विक्री होताना दिसून येत आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात बैलांचे शेतीतील महत्त्व कमी होऊ लागले असल्याने त्यांना म्हणावी तशी मागणी होताना दिसत नाही. यातच चैत्री यात्रेकडे भाविकांनी पाठ फिरवली असल्याने जनावरांच्या बाजाराकडेही भाविकांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येते.


  •