Mon, Jul 22, 2019 00:37होमपेज › Solapur › आषाढीसाठी रेल्वेच्या ७२ ज्‍यादा फेर्‍या

आषाढीसाठी रेल्वेच्या ७२ ज्‍यादा फेर्‍या

Published On: Jul 13 2018 7:29PM | Last Updated: Jul 13 2018 7:29PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरला येणार्‍या भाविकांची प्रवासाची गैरसोय होऊ नये याकसाठी मध्य रेल्वे विभागाने विदर्भ, मराठवाडा, मुंबई, कर्नाटक या भागातून विशेष रेल्वेच्या ७२ फेर्‍यांचे नियोजन केले आहे. अशी माहिती रेल्वेच्या मध्यविभागाकडून देण्यात आली आहे. 

आषाढी यात्रा 23 जुलै रोजी साजरी होत असून त्यानिमित्ताने राज्यभरातून पायी चालत पालखी सोहळे, दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या आहेत. मात्र, ऐनवेळी थेट रेल्वेने येणार्‍या आणि परत जाणार्‍या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वे विभागाने आषाढी यात्रेच्या काळात 17 जुलै ते 29 जुलै या 12 दिवसांमध्ये विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. या 12 दिवसांमध्ये दररोज 6 या प्रमाणात रेल्वेच्या 72 फेर्‍या पंढरपूरसाठी होणार आहेत. 

यामध्ये विदर्भातील भाविकांच्या सोयीसाठी खामगाव, अमरावती येथून, मराठवाड्यातील भाविकांसाठी लातूर येथून, कोकण, मुंबईच्या भाविकांसाठी मुंबईतून तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्रातील भाविकांच्या सोयीसाठी मिरज येथून विशेष रेल्वे गाड्यांची सोय केलेली आहे. खामगावची रेल्वे गाडी जलंब, नांदुरा, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव मार्गे अप, डाऊन अशा 4 फेर्‍या करणार आहे. तर अमरावती -पंढरपूर या गाडीच्याही भुसावळ, जळगाव, दौंड मार्गे 4 फेर्‍या होणार आहेत.  मराठवाड्यातील भाविकांच्या सोयीसाठी लातूर -पंढरपूर या रेल्वे गाडीच्या 10 फेर्‍या होणार आहेत.  अन्य रेल्वेने येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी कुर्डुवाडी जंक्शन स्टेशनवरून पंढरपूरसाठी 12 फेर्‍या तर मिरज -कुर्डूवाडी दरम्यान 20 फेर्‍या, मिरज-पंढरपूर या गाडीच्या 20 फेर्‍या यात्रा कालावधीत होणार आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनंस येथून मिरजपर्यंत धावणार्‍या रेल्वे गाडीच्या 2 फेर्‍या  करणार आहेत. रेल्वेचा प्रवास आरामदायी आणि किफायतशीर असल्यामुळे वारकर्‍यांची रेल्वे प्रवासाला पसंती वाढते आहे. त्यामुळे रेल्वेने या 72 फेर्‍यांचे नियोजन यात्रेच्या काळात केल्याची माहिती मध्य रेल्वे विभागाकडून देण्यात आली.

20 डब्यांची खामगाव-पंढरपूर रेल्वे 
खामगाव-पंढरपूर  या रेल्वे गाडीच्या 4  फेर्‍या होणार असून या रेल्वे गाडीला 20 डबे असणार आहेत. या गाडीसाठी तिकीट आरक्षणाची सोय नाही.  अमरावती-पंढरपूर या रेल्वे गाडीला 16 डबे असणार आहेत. मात्र, या गाडीसाठीही तिकीट आरक्षणाची सोय नाही.