Sat, Aug 17, 2019 16:12होमपेज › Solapur › सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या  फलकाला चपलांचा हार!

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या  फलकाला चपलांचा हार!

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 9:44PMसोलापूर ः प्रतिनिधी

प्रहार शेतकरी संघटना व जनशक्‍ती पक्षाच्या वतीने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सोलापूर शहर येथील अक्‍कलकोट  रोड  शाखेला  चपलांचा हार घातला आहे. बुलडाणा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकार्‍याने पीक कर्ज मागणीसाठी आलेल्या शेतकरी पत्नीस शरीरसुखाची मागणी केल्याने राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. सोलापुरातदेखील रविवारी सकाळी सुमारास चपलांचा हार घालून निषेध व्यक्‍त करण्यात आला.

बुलडाणा येथील ग्रामीण भागात राहणारे शेतकरी दाम्पत्य गुरुवारी पीक कर्जासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले होते. त्यावेळी कागदपत्रे तपासून बँक अधिकार्‍याने मोबाईल क्रमांक देण्यास सांगितले. शेतकर्‍याने आपल्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला होता. त्यानंतर बँक अधिकार्‍याने शेतकर्‍याच्या पत्नीस फोन करून अश्‍लील संभाषण केले व पीक कर्ज मंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी केली होती. पीक कर्जासोबत दुसरे पॅकेज देण्याचे आश्‍वासन बँकेतील शिपायामार्फत दिले होते. शेतकर्‍याच्या पत्नीने हा घृणास्पद व लज्जास्पद संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतले व पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल होताच माध्यमांद्वारे हा प्रकार जनतेसमोर आला व सोशल मीडियामधून या घृणास्पद प्रकाराबद्दल संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या. बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी ताबडतोब बुलढाणा येथील त्या  बँक अधिकार्‍यास निलंबित केले असल्याची माहिती दिली.

या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अक्कलकोट रोड येथील शाखेला चपलांचा हार घातला. रविवार असल्याने बँकेला सुटी होती.परंतु कार्यालयीन कामकाजासाठी एक दोन अधिकारी बँकेत काम करण्यासाटी आले होते. परंतु निषेध कार्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पाहून बँक अधिकारी परत गेले.

चपलांचा हार घालताना शहरप्रमुख अजित  कुलकर्णी , कार्यकारी प्रमुख जमीर  शेख, उपप्रमुख खालिद मनियार, विद्यार्थी  प्रमुख अनिकेत  भूमकर, शोहेब मुल्ला, मुदस्सर हुंडेकरी, शब्बीर  नदाफ, संभाजी  व्हनमारे, मुस्ताक  शेतसंधी, आय.बी.  जमादार , जावेद  मणियार, असिफ  शेख, फिरोझ  शेख, धनराज  दुलंगे, प्रल्हाद  वाघमारे, तोलन भाई, असिफ दुपटघर आदी  उपस्थित होते.