होमपेज › Solapur › दुभत्या जनावरांच्या संशोधनासाठी केंद्र

दुभत्या जनावरांच्या संशोधनासाठी केंद्र

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी 

दुभत्या जनावरांवरील संशोधनासाठी सोलापूर जिल्ह्यात ‘सेंटर ऑफ एक्सलन्सी’  स्थापन करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोला व राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड, आणंद यांच्या संयुक्‍त विद्यमाने पंढरपुरी म्हैस वंशावळ सुधारणा प्रकल्पांतर्गत पंढरपूर येथे आयोजित पशुपालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना जानकर बोलत होते. कार्यक्रमास आ. प्रशांत परिचारक, आ. भारत भालके, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्‍त कांतीलाल उमाप, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ. दिनकर बोर्डे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, प्रकल्प समन्वक डॉ. राजकुमार वसुलकर आदी उपस्थित होते.

ना. जानकर म्हणाले की, चांगल्या दुभत्या जनावरांची  वंशावळ वाढावी, यासाठी संशोधन व्हावे. त्यांच्या  संगोपनासाठी  शेतकर्‍यांना मार्गदर्शन  देण्याचे काम सेंटर ऑफ एक्सलन्सी  या पायलट प्रोजेक्टद्वारे होणार आहे.  यासाठी सोलापूर जिल्ह्यात 200 एकर जागा उपलब्ध झाल्यास हे केंद्र उभारण्यात येईल. सेंटर ऑफ एक्सलन्सी हा पायलट प्रोजेक्ट आपल्याकडे सुरू झाल्यास  तज्ज्ञांमार्फत या केंद्रातून पंढरपुरी म्हशीबरोबरच  चांगल्या दुभत्या जनावरांवर संशोधन करून  पशुपैदास वाढविण्याचा प्रयत्न होणार आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माढा व सांगोला तालुक्यांत  पंढरपुरी म्हशीमध्ये घरपोच कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दुभत्या जनावरांना चांगला ओला चारा मिळावा यासाठी चारायुक्‍त शिवार योजना राबविण्यात येत आहे. तसेच राज्यात दुधाचा एकच ब्रँड असावा यासाठीही प्रयत्न करण्यात येत असल्याचे ना. जानकर यांनी सांगितले.

राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे  संपूर्ण दवाखान्यांना आएएसओ मानांकन मिळविण्यासाठी नजीकच्या काळात प्रयत्न केले जातील. पशुसंवर्धन दवाखान्यांना आयएसओ मानांकनामध्ये सोलापूर जिह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 146 पशुसंवर्धन दवाखान्यांना आएएसओ मानांकन मिळविल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. आ. प्रशांत परिचाक म्हणाले, दुधाला चांगला भाव देण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत. दूध व्यवसायाच्या वाढीसाठी शेतकर्‍यांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. दुभत्या जनावारांची वंशावळ निर्माण करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.आ. भालके म्हणाले, जातीवंत जनावारांची पैदास वाढावी यासाठी प्रयत्न व्हावेत.  दुधाला चांगला दर मिळावा. जनावरांना पाणी मुबलक मिळावे, तसेच पंढरपूर येथे दूृध उत्पादकांच्या जनावारांसाठी स्वतंत्र पाण्याचा टँक पशुसंवर्धन विभागामार्फत तयार करण्यात यावा, अशी  मागणी त्यांनी केली.

Tags : Solapur, Solapur News, Center of Excellence, established, Solapur district


  •