Tue, Apr 23, 2019 19:36होमपेज › Solapur › ‘स्टार’ सीईओंनी राखला पदाधिकारी व अधिकार्‍यांत समन्वय

‘स्टार’ सीईओंनी राखला पदाधिकारी व अधिकार्‍यांत समन्वय

Published On: May 11 2018 12:46AM | Last Updated: May 10 2018 11:54PMसोलापूर :  प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना या पदावर  बुधवारी  एक  वर्षाचा  कालावधी  पूर्ण झाला. ते  थेट  आयएएस  असल्याने पदाधिकार्‍यांत ते कितपत रुजतील याबाबत शंका होती. मात्र जि.प. अध्यक्ष  संजय शिंदे  व डॉ. भारुड या दोघांनी जिल्हा परिषदेच्या गाडीच्या चाकाचा तोल सांभाळून ठेवला आहे. शिक्षण, स्वच्छता विभाग, घरकुल योजना आदी विभागांत डॉ. भारुड यांना अत्यंत चांगले काम करुन घेता आले.  मात्र आरोग्य व  डीबीटी योजना पूर्णत्वास  आणण्यासाठी त्यांना अजून तरी यश मिळाले नसल्याने त्यांना यापुढील काळात यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. 
9 मे 2017  रोजी  डॉ. भारुड यांनी पदभार हाती घेत जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामास सुरुवात केली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची बदली नांदेड जिल्हाधिकारी या पदावर झाली.

त्यांच्या जागी नांदेड येथील सहायक जिल्हाधिकारी पदावरील डॉ. भारुड यांची सोलापूरला सीईओ म्हणून नियुक्‍ती झाली. थेट आयएसएस अधिकारी असल्याने धुळेसारख्या दुर्लक्षित भागातून गरिबीतून वर आलेल्या डॉ. भारुड यांच्याकडून नव्या दमाने कामाची अपेक्षा होती. त्यांचा कामाचा उत्साह अपेक्षेप्रमाणे दिसूनही आला.  थेट आयएसएस असणारे काही अधिकारी त्यांच्या मर्जीनुसार काम करतात. पदाधिकार्‍यांना निर्णय प्रक्रियेत लांब ठेवून अशा अधिकार्‍यांकडून कार्य होत असते. मात्र डॉ. भारुड यांनी मात्र पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेतच जिल्हा परिषदेच्या दोन्ही चाकांचा समतोल राखण्यात यश मिळवले. 

संपूर्ण स्वच्छता अभियान, प्रगत शैक्षणिक उपक्रम, घरकुल योजना आदींमध्ये डॉ. भारुड यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले. त्यामुळे राज्यभर जिल्हा परिषदेचे नाव झाले. आरोग्य विभागातील काही नवीन योजना, कृषी विभागाकडून शेतकर्‍यांसाठी काही नवीन योजना व उपक्रम सुरु करण्याचा प्रयत्न होण्याची गरज असताना त्यांच्याकडून याबाबत फारसे काही करण्यात आले नाही. त्यामुळे  यापुढील काळात त्यांच्याकडून या दोन्ही विषयांसाठी काम होण्याची अपेक्षा व्यक्‍त होत आहे. जि.प. प्रशासकीय यंत्रणा अत्यंत मोठी आहे. प्रशासकीय यंत्रणेत अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची लॉबी व राजकीय खेळी होत असते. अनेक विभागांत अधिकारी व कर्मचार्‍यांची वानवा आहे. राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा केल्यानंतरही अधिकारी मिळत नाहीत. त्यामुळे उपलब्ध असणार्‍या यंत्रणेतील अधिकार्‍यांनाच  अतिरिक्‍त भार सोपवून डॉ. भारुड जिल्हा परिषदेचा गाडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहेत.  जि.प. सदस्य भारत आबा शिंदे व डॉ. भारुड यांच्यात काही महिन्यांपूर्वी वाद निर्माण झाला होता. मात्र  अध्यक्ष संजय शिंदे यांनी मध्यस्थी करुन हा वाद अलगद मिटविला. 

डॉ. भारुड व भारतआबा  यांनीही याप्रकरणी सामंजस्याची भूमिका घेतल्याने पुन्हा जिल्हा परिषदेचा कारभार सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला. आ. रामहरी रुपनवर व डॉ. भारुड यांच्यातील वादाच्या प्रकरणाचे पडसाद अजूनही ताजे असल्याने याप्रकरणी दोघांना समजून घेण्यास आणखीन काही दिवस जाण्याची शक्यता आहे.