Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Solapur › जिल्हा परिषदेत ‘सीसी कॅमेर्‍यांचा’वॉच

जिल्हा परिषदेत ‘सीसी कॅमेर्‍यांचा’वॉच

Published On: Jun 28 2018 1:36AM | Last Updated: Jun 27 2018 10:04PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद शिक्षण विभागात गत आठवड्यात घडलेल्या घटनेमुळे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात 76 सीसी कॅमेरे तैनात करुन संपूर्ण कारभारच इन कॅमेर्‍यात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयानुसार बुधवारी जिल्हा परिषदेत सीसी कॅमेरे बसविण्याचे कामही तातडीने सुरु करण्यात आले. 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड व एका शिक्षकात झालेल्या वादावादी प्रकरणात शिक्षणाधिकारी यांच्याविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षणाधिकारी यांची याप्रकरणी काहीच चूक नसतानाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची भूमिका अधिकार्‍यांनी घेतली होती. घटनेच्या वेळी नेमके काय घडले, याबाबत कोणताही पुरावा नसल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात सीसी कॅमेरा बसवून सर्व कामकाज इन कॅमेर्‍यात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील काळात अशा काही घटना घडल्याच तर त्याचा सक्षम पुरावा जिल्हा परिषदेकडे असणार आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या सुरक्षा व अंतर्गत बेशिस्त रोखण्यासाठी हा रामबाण उपाय ठरणार असल्याने डॉ. भारुड यांनी तातडीने हा निर्णय घेत या निर्णयाची अंमलबजावणीही सुरु केली आहे. 

जिल्हा परिषद निधीतून या उपक्रमासाठी दहा लाखापेक्षा कमी खर्चात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे कामकाज इन कॅमेर्‍यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. प्रशासकीय इमारतीच्या अंतर्गत असणारे सर्व कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासह जिल्हा परिषदेच्या वाहनतळाभोवती सीसी कॅमेर्‍याच्या नजरा 24 तास ठेवण्यात येत आहे. पदाधिकार्‍यांच्या दालनात सीसी कॅमेरे बसणार की नाही, हा विषय मात्र अजून तरी अधांतरीच असल्याचे दिसून येते. त्यामुळे पदाधिकार्‍यांची भूमिका यावेळी उत्सुकतेची ठरत आहे. 

खातेप्रमुखांची नाराजी तरीही कॅमेरा बसणारच

जिल्हा परिषद कार्यालयात पारदर्शकता निर्माण व्हावी, काही विपरीत घटना घडल्यास त्या घटनेचा योग्य सोक्षमोक्ष समोर यावा, बेशिस्तपणा दूर व्हावा, या हेतूने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी मुख्यालयात 76 कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यांच्या या निर्णयाविरुध्द काही अधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे.