Thu, Aug 22, 2019 13:01होमपेज › Solapur › ‘त्या’ समझोत्यानुसार यन्‍नम महापौर!

‘त्या’ समझोत्यानुसार यन्‍नम महापौर!

Published On: Jun 07 2018 11:02PM | Last Updated: Jun 07 2018 10:37PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

महापौरपद सव्वा-सव्वा वर्षाकरिता विभागून देण्याच्या गतवर्षी झालेल्या समझोत्यानुसार आपल्याला महापौरपद देण्यात यावे, अशी मागणी  भाजपच्या नगरसेविका श्रीकांचना यन्नम यांनी केली आहे. यावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांना भेटू, असा शब्द यन्नम यांना दिल्याने यासंदर्भात पालकमंत्री-सहकारमंत्री गटांत नवीन वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.

भाजप सत्तेवर आल्यानंतर महापौरपदासाठी अनेकजण इच्छुक होते. पालकमंत्री गटाच्या श्रीकांचना यन्नम, शशिकला बत्तुुल, सहकारमंत्री गटाच्या शोभा बनशेट्टी आदींनी या पदासाठी दावा केला होता. पालकमंत्री गटाने यन्नम यांच्या नावाचा जोरदार आग्रह धरला होता. दुसरीकडे बनशेट्टी यांच्यासाठी सहकारमंत्री गटाने जोरदार फिल्डींग लावली. दोन्ही गट आपापल्या मागणीवर ठाम असल्याने निर्माण झालेला पेच सुटत नव्हता. अखेर पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोघांनी एकत्र येऊन महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल विभागून अनुक्रमे बनशेट्टी, यन्नम यांना संधी देण्याचा समझोता केला होता. यानुसार बनशेट्टी यांनी 8 मार्च 2017 रोजी महापौरपदाची सुत्रे हाती घेतली. समझोत्यानुसार त्यांच्या सव्वा वर्षाचा कार्यकाल 8 जून रोजी संपणार आहे. या पार्श्‍वभूमीवर यन्नम यांनी चार दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांची भेट घेऊन आपल्याला ठरल्यानुसार महापौरपद देण्याची मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी मनपा बजेटची सभा 12 जून रोजी झाल्यावर याविषयाबाबत नगरसेवकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. या विषयावरुन पालकमंत्री-सहकारमंत्री या दोन गटात नवावाद पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात दै. ‘पुढारी’ने भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. 

पालकमंत्री, महापौर बनशेट्टी यांचा सावध पवित्रा

 समझोत्यानुसार आपल्याला महापौरपद बहाल करुन न्याय द्यावा, अशी मागणी आपण पालकमंत्र्यांकडे केल्याची माहिती नगरसेविका यन्नम यांनी  दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. याबाबत पालकमंत्र्यांशी संपर्क साधला असता बैठकीत असल्याचे सांगत त्यांनी बोलणे टाळले, तर महापौर बनशेट्टी यांनी ‘त्या’ समझोत्याविषयी आपल्याला माहिती नसल्याचे सांगत दोन मिनिटांनी आपले म्हणणे मांडू, असे सांगितले.