Tue, Apr 23, 2019 00:08होमपेज › Solapur › बुलेट चोरास अटक; इनोव्हा कारसह 3 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

बुलेट चोरास अटक; इनोव्हा कारसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On: Jun 01 2018 10:23PM | Last Updated: Jun 01 2018 10:12PMसोलापूर : प्रतिनिधी

बुलेट चोरणार्‍यास फौजदार  चावडी पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून चोरीची 1 लाख रुपये किंमतीची बुलेट जप्त करण्यात आली. तसेच फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीची इनोव्हा कार कर्नाटकातील गुलबर्गा येथून जप्त करण्यात आली आहे. सचिन भाऊसाहेब घोडके (वय 19, रा. बोराळे, ता. मंगळवेढा) असे अटक करण्यात आलेल्या बुलेट चोराचे नाव आहे. फौजदार चावडी पोलिसांना मंगळवेढा रोडवरील सीएनएस हॉस्पिटलजवळील एमएसईबी सब स्टेशनच्यासमोर रस्त्यावर एक संशयित वाहनस्वार थांबला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी जाऊन बुलेटवर थांबलेल्या सचिन घोडके याची चौकशी केली. गाडीची कागदपत्रे मागितली असता ती देण्यास उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला. त्यावेळी त्याने त्याच्याकडील बुलेट ही चोरल्याचे सांगितले. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सचिन घोडके यास अटक करुन बुलेट जप्त केली आहे.

तसेच फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील 2 लाख 50 हजार रुपये किंमतीची इनोव्हा कार ही कर्नाटकातील गुलबर्गा येथून जप्त करण्यात आली आहे. या कारच्या चोरीचा गुन्हा फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल आहे. गुलबर्गा येथील कमी रहदारीच्या रस्त्याच्या कडेला काटेरी  झुडुपात ही कार बेवारसस्थितीत  लावण्यात आली होती. ही कार चोरणारा चोरटा मात्र मिळून आलेला नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलिस निरीक्षक संजय जगताप, दुय्यम पोलिस निरीक्षक शहाजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, हवालदार अनिल जाधव, गौतम जगझाप आदींनी केली.