Sun, Jun 16, 2019 02:29होमपेज › Solapur › जिल्हा परिषदेत आज बजेट सभा

जिल्हा परिषदेत आज बजेट सभा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात दोन वाजता बजेटची सभा होत आहे. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे हे सभागृहात वर्षाचा ताळमेळ सादर करणार असून त्यांच्या सुटकेसमध्ये नेमके दडलंय तरी काय, याची उत्सुकता ग्रामीण भागातील नागरिकांना लागली आहे. 

जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्‍नातून दरवर्षी विविध योजना घेण्यात येतात. सुमारे 40 कोटी रुपयांच्या निधीतून जिल्हा परिषदेचा ताळमेळ घातला जातो. यंदाच्या वर्षी मागील वर्षाच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करता बजेटमध्ये सुमारे दहा कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, जिल्हा परिषदेला मिळणारे उत्पन्‍न अलीकडच्या काळात कमी झाल्याने यंदा बजेट जेमतेम पुन्हा 40 कोटींपर्यंत सीमित राहण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. 

राज्य शासनाने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या डीबीटी योजनेमुळे जिल्हा परिषदेचा निधी खर्च होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गत दोन वर्षांत राहिलेल्या अखर्चित निधीमुळे जिल्हा परिषदेला अन्य कामांसाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. डीबीटी योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याची संधी हेरून अनेक विभागांनी बांधकाम व सामूहिक खरेदी प्रक्रियेसाठी निधी प्रस्तावित केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांसाठी डोंगरे यांच्या सुटकेसमध्ये निधीची तरतूद असणार की नाही, याची उत्सुकता आहे. ग्रामीण भागाचा कणा हा शेती व शेतीपूरक व्यवसायावर आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांसाठी भरीव तरतूद अपेक्षित आहे. 

शेतकर्‍यांना दुधाळ जनावरांसाठी, शेळीगटासाठी अनुदानाची तरतूद करुन आपतकालीन परिस्थितीत मदतीचा हात देण्याची भूमिका जिल्हा परिषदेला घ्यावी लागणार आहे. याबाबत बजेटमध्ये नेमकी काय तरतूद करण्यात आली आहे याबाबतही उत्सुकता आहे. जि.प. सेसफंडातून महिला व बालकल्याण, समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन आदी विभागांकडून अनेक कालबाह्य योजना पुन्हा पुन्हा घेण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक सक्षम करणार्‍या योजनांचा समावेश या बजेटमध्ये होईल हा मुद्दाही महत्त्वाचा ठरला आहे. शेतकर्‍यांना पाईपलाईन, स्प्रिंकलर आदींसाठी तरतूद होण्याची गरज निर्माण झाली आहे. 

जि.प. सेसफंडातील अखर्चित असलेला निधी गत दोन वर्षांत जि.प. पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या कार्यालयातील दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी वापरण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या यांच्या दालनातील, निवासस्थानातील व अधिकार्‍यांच्या दालनातील कामे आता अनेक झाली आहेत. त्यामुळे या कामांसाठी अधिक निधीची तरतूद न करता ग्रामीण भागातील उपेक्षित व वंचित घटकांच्या विकासाच्या योजनांसाठी निधीची तरतूद होईल, अशीच अपेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांची आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे उत्पन्‍न वाढविण्यासाठीही जि.प. पदाधिकार्‍यांचा आज कस दिसून येणार आहे.

Tags : Solapur, Solapur News, Budget, meeting, Zilla Parishad


  •