Mon, Jul 15, 2019 23:54होमपेज › Solapur › सोलापूर : आई, भावासह चौघांना जिवंत जाळले!

सोलापूर : आई, भावासह चौघांना जिवंत जाळले!

Published On: Jun 29 2018 10:19AM | Last Updated: Jun 29 2018 11:34PMबार्शी : गणेश गोडसे

कौटुंबिक व शेतीच्या वादातून थोरल्या भावानेच झोपेत असलेल्या आई व पोलिस नाईक असलेल्या धाकट्या भावासह भावाची पत्नी व लहान मुलगा यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. यावेळी लागलेल्या आगीत या चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तसेच घरातील संसारोपयोगी साहित्यदेखील जळून खाक झाले. ही नृशंस घटना बार्शी तालुक्यातील खांडवी येथे शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

 राहुल कुरुनदास देवकते (वय 32), सुषमा राहुल देवकते (26), आर्यन (2) आणि कस्तुराबाई कुरुनदास देवकते (65) अशी मृतांची नावे आहेत. 

संशयित आरोपी रामचंद्र देवकते (35) हादेखील  यावेळी 50 टक्के भाजला असून त्याच्यावर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सध्या आरोपीस नजरकैदेत ठेवले आहे. कस्तुराबाई देवकते यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या जबानीआधारे आरोपी रामचंद्र याच्याविरुद्ध अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन जिवे ठार मारल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास चौघाही मृतांवर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सविस्तर वृत्त असे की, खांडवी येथे कस्तुराबाई  देवकते व त्यांची दोन मुले राहुल व रामचंद्र देवकते व त्यांचे कुटुंब एकत्र राहतात. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून दोन्ही भावांत मिळून 12 एकर शेती आहे. राहुल हा उस्मानाबाद येथे पोलिस दलात पोलिस नाईक म्हणून कार्यरत आहे. तो खांडवी येथून दररोज जा-ये करत असे, तर रामचंद्र हा गावीच शेती करतो. मागील काही दिवसांपासून रामचंद्र व राहुल यांच्यात शेतजमीन तसेच संपत्तीवरून वाद सुरू होता.

रामचंद्रने चौघांना पेटवून दिले : कस्तुराबाई

याघटनेबाबत कस्तुराबाई यांनी मृत्युपूर्व दिलेल्या जबाबात नमूद आहे की, गुरूवारी सायंकाळी रात्रीचे जेवण उरकून सर्वजण झोपले होते. रामचंद्र देवकते याने मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास माझ्यासह घरात झोपलेल्या चौघांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. घटनेत भाजून गंभीर जखमी झाल्यामुळे सुषमा देवकते व आर्यन देवकते हे दोघेजण जागेवरच मृत्युमुखी पडले. घटनेनंतर जोरदार स्फोट झाल्याने शेजारच्यांना हा प्रकार कळला. तसेच घरात मोठ्या प्रमाणात आग भडकून सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. आग मोठी असल्याने कुणाला घरात जाता आले नाही. 

पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल

ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बेदरे, हवालदार राजेंद्र मंगरूळे आदी पोलिस कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीस मदत करत ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना घराबाहेर काढले. 

संशयित आरोपीचे कुटुंब सुरक्षित

रामचंद्रने आपली पत्नी व दोन मुलांना दुसर्‍या एका खोलीत सुरक्षित बंद करून ठेवले होते व बाहेरून कडी लावली होती. त्यामुळे ते सुखरूप बचावले आहेत. घटनास्थळी रॉकेलचे कॅन, लाकडी काठ्या आदी साहित्य निदर्शनास आले. 

फॉरेन्सिक लॅबच्या पथकाकडून पाहणी

शुक्रवारी सकाळी घटनास्थळी सोलापूर येथून आलेल्या फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने पाहणी केली व काही नमुने हस्तगत केले. या पथकाच्या सदस्यांनी संपूर्ण घटनास्थळाचा पंचनामा करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. 

खांडवी गावावर शोककळा

भावाने भावाचे संपूर्ण कुटुंबच जीवंत जाळल्याच्या निर्घृण घटनेने संपूर्ण खांडवी गावावर शोककळा पसरली होती. बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात सुषमा व आर्यन या दोघांचे, तर राहुल व कस्तुराबाई या दोघांचे शवविच्छेदन उस्मानाबाद येथील जिल्हा रुणालयात करण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह खांडवी येथे आणण्यात आले. त्यानंतर चारही मृतदेहांवर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर करत आहेत. या थरारक घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अधिकार्‍यांना तपासाबाबत सूचना केल्या होत्या. 

आरोपी म्हणतो चिमणी अंगावर पडली

दरम्यान, पोलिसांनी आरोपी रामचंद्र देवकते याच्याकडे विचारपूस केली असता त्याने घरातील चिमणी अंगावर पडून आग लागल्याचे सांगितले. त्यामुळे ही घटना चिमणीमुळे घडली की रामचंद्र याने शेती व संपत्तीच्या वादातून अतिशय थंड डोक्याने घडविलेले हत्याकांड आहे याबाबतचा तपास पोलिस करत होते. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल, आईने दिलेला मृत्युपूर्व जबाब, रामचंद्र याच्या पत्नीचा जबाब आणि पोलिस यंत्रणेने केलेला तपास यातूनच सत्य काय ते बाहेर येणार आहे. तथापि, कौटुंबिक वादातूनच थोरल्या भावाने हे हत्याकांड केल्याची चर्चा गावात सुरू आहे.