Tue, Jul 23, 2019 11:55होमपेज › Solapur › मुलींनी आईला जिवंत ठेवले अवयवरूपी

मुलींनी आईला जिवंत ठेवले अवयवरूपी

Published On: Jul 02 2018 1:50AM | Last Updated: Jul 01 2018 10:59PMसोलापूर : इरफान शेख

आईला जिवंत ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे पुष्पलता चव्हाण यांच्या तिन्ही मुलींनी सांगितले. शनिवारी  रात्री कुंभारी येथील अश्‍विनी रुग्णालयात अपघाती ब्रेनडेड झालेल्या  पुष्पलता यांचे किडनी, डोळे व लिव्हरचे प्रत्यारोपण करण्यात आले.

गुरुवारी सकाळी पुष्पलता हणुमंत चव्हाण (वय 48, रा.उस्मानाबाद) या आपल्या पतीसोबत दुचाकी वाहनावर बसून जात होत्या. सोलापूर- उस्मानाबाद महामार्गावर दुचाकी वाहन स्लीप होऊन दोघे दांपत्य जबर जखमी झाले होते.पुष्पलता यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्या शुध्दीवर आल्याच नाहीत. सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी गुरुवारी रात्रीच दाखल करण्यात आले होते. डॉ. वडगावकर व डॉ.दंबल यांनी पुष्पलता  चव्हाण  यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले  होते. परंतु डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या उपचारास प्रतिसाद देत नव्हत्या. शेवटी त्यांच्या मेंदूचे सीटी स्कॅन व एमआरआय केल्याने पुष्पलता चव्हाण यांचे ब्रेनडेड झाले असल्याचे निष्पन्न झाले.
रुग्णांच्या नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी सोलापूरातून रुग्ण हलविले व उस्मानाबाद येथील खासगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी घेऊन गेले. परंतु ब्रेनडेड झालेल्या रुग्णास कसे वाचविणार, कसे त्याला सर्वसाधारण आयुष्यात परत आणणार हा मोठा प्रश्‍न रेणुकासह तीनही मुली  व पतीसमोर होता.

बे्रनडेड झालेल्या आईस कसे जिवंत ठेवू, कुठे इलाज करु म्हणून पुष्पलता यांची मुलगी रोहिणी चव्हाण ढसाढसा रडू लागली. अवयव दान केल्याने व्यक्ती मरत नसून एका शरीरातून दुसर्‍या शरीरात पदार्पण करते ही जाणीव आता प्रत्येकाला होत आहे. त्यामुळे ब्रेनडेड पुष्पलता यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शनिवारी सकाळी ब्रेनडेड रुग्णास कुंभारी येथील अश्‍विनी रुग्णालयात दाखल करण्यात  आले. सायंकाळपर्यंत अवयवदानाचे कागदोपत्री कामकाज करण्यात आले व शनिवारी  रात्री अवयवदान  प्रत्यारोपण सुरु झाले. रविवारी पहाटेपर्यंत लिव्हर, किडनी व डोळ्यांचे प्रत्यारोपण झाले.अवयवदानाची शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. संदीप होळकर यांनी नेतृत्व केले, तर सहायक डॉ.शोएब खान,डॉ.आर.पी.डॉ.अस्थाना यांनी प्रमुख भूमिका बजावली. 

अवयवदानाच्या शस्त्रक्रियेनंतर पुष्पलता यांच्या तीनही मुलींनी आई तू जिवंत असून आमच्यासोबत आहेस,  अशी हाक देत हंबरडा फोडला.