Fri, Apr 26, 2019 19:47होमपेज › Solapur › पालकमंत्र्यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे अडले दोन्ही पॅनल

पालकमंत्र्यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे अडले दोन्ही पॅनल

Published On: Jun 01 2018 10:23PM | Last Updated: Jun 01 2018 10:19PMसोलापूर : संतोष आचलारे 

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवारी शेवटचा दिवस असतानाही या निवडणुकीसाठी अपेक्षित असणार्‍या लढती अजूनही पालकमंत्र्यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे स्पष्ट झाले नाहीत. त्यांच्या भूमिकेवरच बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल परिणामकारक ठरणार असल्याने, ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजार समितीची निवडणूक ही पक्षीय चिन्हावर घेण्यात येत नाही.

मात्र भाजपची या बाजार समितीवर एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शर्तीचे प्रयत्न आहेत. सहकार मंत्री विरुध्द पालकमंत्री यांच्यात असलेले शीतयुध्द सर्वांना परिचित झाले आहे. सहकार मंत्र्यांना खिंडीत गाठण्यासाठी पालकमंत्री देशमुख यांच्याकडूनही प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये पालकमंत्री देशमुख यांना आणण्याचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरु आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांना ना. शरद पवार यांच्यामार्फत या पॅनलमध्ये काकांना आणण्यात या पॅनलप्रमुखांना यश आले आहे. मात्र पालकमंत्र्यांना या पॅनलमध्ये आणण्यात अजून तरी यश आल्याचे दिसून येत नाही. 

बाजार समितीत 39 कोटी रुपयांचा  गैरप्रकार केल्याने तत्कालीन संचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान मंत्री अशा पॅनलमध्ये गेल्यास त्यांची प्रतिमा योग्य राहणार नाही, अशी भीती घालण्यात येत असल्याने पालकमंत्री काँग्रेसच्या पॅनलपासून दोन पाऊल सध्या तरी लांब राहिले आहेत. कुंभारी मतदारसंघातून पालकमंत्री देशमुख यांची बिनविरोध निवड करुन, त्यांना भाजपच्या घरात घेण्याचा आटोकाट प्रयत्न सहकारमंत्री गटातून करण्यात येत आहे. याबाबतही पालकमंत्र्यांनी अजून तरी प्रतिसाद दिला नाही. बाजार समितीच्या गैरप्रकरणाबाबत गुन्हा दाखल झाल्याने काही दिग्गज नेत्यांनी आपल्या कुटुंबातील दुसर्‍या फळीतील युवकांना निवडणूक रिंगणात उतरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हाच प्रयत्न जर निवडणुकीत कायम राहिला, तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडूनही अशीच भूमिका घेतली जाण्याचीही शक्यता व्यक्‍त होत आहे.