Tue, May 21, 2019 19:13होमपेज › Solapur › तुकोबारायांच्या मुक्‍कामासाठी बोरगाव नगरी सज्ज

तुकोबारायांच्या मुक्‍कामासाठी बोरगाव नगरी सज्ज

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 17 2018 9:12PMश्रीपूर : वार्ताहर 

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी बोरगांव (ता.माळशिरस) मुक्‍कामी येणार असल्याने वारकर्‍यांना चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जय्यत तयारी करण्यात आली  आहे.

यंदा तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारचा अकलूज येथील मुक्‍कामानंतर  गुरुवारी सकाळी माळीनगरला  भोजन व  उभे  रिंगण उरकून दुपारी पालखी बोरगांवच्या मुक्‍कामाला निघणार आहे. या पालखी बरोबर असंख्य दिंड्यांसोबत व पायी चालणारे लाखों भाविक असतात. त्यांना वीज, पाणी, स्वच्छता व आरोग्य सुविधा पुरवण्यात  ग्रामपंचायतच्यावतीने गावातील गटारी, अंतर्गत रस्ते यांची साफसफाई  आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचे उपलब्ध स्त्रोतामध्ये टीसीएल पावडर टाकून पाणी निर्जंतूक करण्यात आले आहे. भाविकांना रहाण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळा, समाज मंदिर व ग्रामपंचायतच्या इमारती उपलब्ध केल्या आहेत. त्याचबरोबर वाड्या वस्त्यांवर दिवाबत्तीची सोय केली आहे.  मोहनराव पाटील सांस्कृतिक हॉलमध्ये पालखी दर्शनासाठी ठेवण्याची व्यवस्था केली असून भजन कीर्तनासाठी हॉल समोरच वॉटर प्रूफ मंडपाची उभारणी केली आहे. 

आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक सज्ज झाले आहे. या ठिकाणी सर्व डॉक्टर अधिकारी 24 तास  वारकर्‍यांना सेवा देणार आहेत. बोरगांव  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही सज्ज झालो असल्याचे सरपंच तात्यासाहेब साठे यांनी दै. ‘पुढारी’ शी बोलताना सांगितले.